पान टपरीवर विक्रीसाठी ठेवलेला अंमली पदार्थ जप्त; दोघांना अटक

पिंपरी : अमली पदार्थ मिश्रीत पावडर विक्रीसाठी मंगलमूर्ती पान स्टॉल मध्ये ठेवल्याने पान स्टॉल धारकास अटक करण्यात आली. ही कारवाई शुक्रवार 20 मार्च रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास मंगलमूर्ती पान स्टॉल, शिवाजी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे करण्यात आली .

याबाबत गोविंद देवराव डोके पोलीस शिपाई, अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्ञानेश्वर उर्फ माऊली नामदेव वानखेडे (वय 25, रा. रजनीगंधा हाऊसिंग सोसायटी, चिंतामणी गणपती मंदिर शेजारी वाल्हेकरवाडी, चिंचवड), मोहनलाल गोमाजी भाटी (वय 55 ,मु. पो. बालियान, ता. बाली, जि. पाली, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगलमूर्ती पान स्टॉल मध्ये आरोपी क्रमांक एक यांनी 56 हजार आठशे रुपये किंमतीचा अमली पदार्थ मिश्रीत पावडर बेकायदेशीररित्या विक्रीकरिता बाळगली. अमली पदार्थ मिश्रीत उग्र वास असलेली पावडर आरोपी क्रमांक एक यांना पोलिसांनी कोठून आणली असे विचारले असता त्याने काळेवाडी फाटा, थेरगाव येथील मुकेश ट्रेडर्स मधील मोहनलाल भाटी (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याकडून आणल्याचे सांगितले. ही पावडर पोलिसांनी जप्त केली. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे हे तपास करत आहेत.

