फक्त मुद्द्याचं!

20th March 2026
पुणे

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट!

माण-हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे पहिल्या टप्प्यात १२ स्थानके सुरू करण्याचे उद्दिष्ट!

‘मेट्रो लाईन ३’ कामाचा पीएमआरडीए महानगर आयुक्तांकडून ‘ऑन ग्राउंड’ आढावा
पुणे : पुणेकर आणि विशेषतः हिंजवडी आयटी पार्कमधील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची ठरणारी ‘मेट्रो लाईन ३’ आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. माण-हिंजवडी ते शिवाजीनगर या मार्गिकेवरील पहिल्या टप्प्याचे काम मे २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पीएमआरडीए प्रशासनाने निश्चित केले आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी गुरुवारी (दि. १९) प्रत्यक्ष ‘ऑन ग्राउंड’ जात पाहणी केली, व या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेतला.

vcc gudhi padva
vcc gudhi padva

‘मिशन मोड’वर सुरू
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, या प्रकल्पाचे काम आता ‘मिशन मोड’वर सुरू झाले आहे. गुरुवारी सकाळी महानगर आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह माण ते शिवाजीनगर या मार्गावरील २३ स्थानकांचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण आणि ‘पीआयटीसीएमआरएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सैनी उपस्थित होते. “कामाचा वेग वाढवताना सुरक्षितता आणि गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका,” अशा कडक सूचना महानगर आयुक्तांनी कंत्राटदार कंपन्यांना दिल्या आहेत. त्यांनी २३.२ किलोमीटरच्या संपूर्ण मार्गिकेची पाहणी केली. केवळ कागदोपत्री अहवालावर अवलंबून न राहता, त्यांनी प्रत्यक्ष कामाचा दर्जा, तांत्रिक अडचणी आणि स्थानकांची सद्यस्थिती जाणून घेतली. पहिल्या टप्प्यात १२ स्थानके कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, त्यादृष्टीने कामाला गती देण्याचे निर्देशही महानगर आयुक्तांनी दिले आहेत.

हिंजवडीतील वाहतूक कोंडीमुळे आयटी कर्मचाऱ्यांना होणारा मनस्ताप कमी करण्यासाठी ही मेट्रो धावणे आवश्यक आहे. मेट्रोमुळे खासगी वाहनांवरील ताण कमी होऊन शिवाजीनगर ते हिंजवडी हे अंतर अवघ्या काही मिनिटांत पार करणे शक्य होईल. सध्या प्रकल्पाचे ९४.२० टक्के काम पूर्ण झाले असून, सिग्नलिंगची तांत्रिक चाचणी सुरू आहे. तसेच आरडीएसओ (RDSO) आणि सीएमआरएस (CMRS) तपासणीची प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.

“मे २०२६ पर्यंत १२ स्थानकांचा पहिला टप्पा पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यादृष्टीने सर्व स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करून कामाला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी ‘पीएमआरडीए’कडून सर्व आवश्यक सहकार्य तत्परतेने दिले जाईल.” —डॉ. अभिजित चौधरी, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
१. स्वरूप: सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावरील देशातील पहिली मेट्रो.
२. मार्गिका: हिंजवडी ते शिवाजीनगर (२३.२ किमी, उन्नत मार्ग).
३. भागीदार: टाटा समूहाची ‘टीआरआयएल’ (TRIL) आणि सीमेन्स प्रोजेक्ट व्हेंचर्स.
४. एकूण खर्च: ८,३१३ कोटी रुपये.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"