फक्त मुद्द्याचं!

7th March 2026
पुणे

“पीएमआरडीए”ला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे कोंदण लाभणार: डॉ. योगेश म्हसे

“पीएमआरडीए”ला जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे कोंदण लाभणार: डॉ. योगेश म्हसे

४३ हजार कोटी, २०४ प्रकल्प आणि ५० वर्षांचे नियोजन!
८३ किमीचा रिंग रोड, मेट्रो-३ आणि २० किमीचा ‘ट्विन टनेल’ ठरणार प्रगतीचे नवे ‘हायवे’,
१८ हजार कोटींच्या रस्ते प्रकल्पांतून महानगराचे रूप पालटणार; वाघोलीचा पाणीप्रश्नही सुटणार!
पुणे : विस्कळीत नागरीकरण आणि वाहतूक कोंडीच्या विळख्यात अडकलेल्या पुणे महानगर प्रदेशाला (PMR) भविष्यात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांचे कोंदण लाभणार आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तब्बल ४३,७७४ कोटी रुपये खर्चाच्या २०४ प्रकल्पांचे जाळे विणले असून, यामुळे पुण्याच्या विकासाची दिशा आणि दशा दोन्ही बदलणार असल्याचा विश्वास महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी व्यक्त केला.

viara vcc
viara vcc

महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांची नुकतीच अल्पसंख्याक विकास विभागाच्या सचिवपदी बदली झाली असून, त्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी औपचारिक चर्चा करताना ‘पीएमआरडीए’च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा सविस्तर आढावा सादर केला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांच्या सीमा ओलांडून विस्तारणाऱ्या या महानगराचा विचार केवळ आजचा नाही, तर पुढील ५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आला आहे. यामध्ये दळणवळण, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण रक्षण आणि शिस्तबद्ध गृहनिर्माण या चतु:सूत्रीवर भर देण्यात आला आहे.

दळणवळणाचे नवे जाळे: १८,६९७ कोटींची गुंतवणूक : पुणे महानगरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘इनर रिंग रोड’ हा प्रकल्प ‘गेमचेंजर’ ठरणार आहे. १४,२०० कोटी रुपये खर्चाचा हा ८३ किमीचा मार्ग ५ टप्प्यांत विभागलेला असून तो सध्या नियोजनाच्या स्तरावर आहे. पीएमआरडीए क्षेत्रात एकूण ५८९ किमी लांबीचे ९६ रस्ते प्रकल्प प्रगतीपथावर असून त्यासाठी १८,६९७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये औद्योगिक कनेक्टिव्हिटी (६० किमी), विमानतळ जोडणी (६१ किमी) आणि चाकण व हिंजवडी भागातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विशेष ‘डिक्लॉगिंग’ रस्त्यांचा समावेश आहे. तसेच, शहराच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जलद प्रवासासाठी येरवडा ते कात्रज दरम्यान ७,५०० कोटींचा २० किमीचा ‘ट्विन टनेल’ प्रस्तावित असून, त्याचा व्यवहार्यता अहवाल (Feasibility Report) तयार झाला आहे.

मेट्रो आणि आधुनिक सार्वजनिक सुविधा : सार्वजनिक वाहतुकीला बळकटी देण्यासाठी हिंजवडी ते शिवाजीनगर या २३ किमीच्या ‘मेट्रो लाईन-३’ चे काम वेगाने सुरू आहे. ८,३१३ कोटींचा हा प्रकल्प एप्रिल २०२६ पर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचे उद्दिष्ट असून, काही स्थानकांचे काम वगळता ही मार्गिका कार्यान्वित होईल. पर्यटनाच्या दृष्टीने लोणावळ्यातील टायगर व लायन्स पॉईंट येथे ८२२ कोटींचा स्कायवॉक प्रकल्प ‘पीपीपी’ तत्त्वावर साकारला जात असून, पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रासाठी (PIECC) ९८२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
‘टीपी स्कीम’ आणि गृहनिर्माण : पुण्यातील विस्कळीत शहरीकरणाला लगाम घालण्यासाठी पीएमआरडीएने १५ नगररचना योजना (TP Schemes) प्रस्तावित केल्या आहेत. सध्या १,८९२ कोटींच्या ५ योजना (माण-म्हाळुंगे, वडाचीवाडी, औताडे-हांडेवाडी, होळकरवाडी ४ व ५) मंजूर असून त्यापैकी बहुतांश प्राथमिक टप्प्यात आहेत. गृहनिर्माणाबाबत, सेक्टर-१२ आणि औंध पोलीस गृहनिर्माण अशा ४ प्रकल्पांतून १,२१८ कोटींची गुंतवणूक केली जात असून, ही कामे आता अंतिम टप्प्यात आहेत.

पर्यावरण आणि पाणीपुरवठा : वाघोली परिसरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी २३ कोटींची योजना पूर्णत्वाकडे असून ती हस्तांतरणाच्या स्थितीत आहे. पर्यावरणाबाबत महत्त्वाची पावले उचलताना इंद्रायणी, पवना आणि मुळा-मुठा नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी १,९६७ कोटींचे ३ प्रकल्प निविदा स्तरावर आहेत. तसेच ३३५ किमीच्या सांडपाणी वाहिन्यांच्या जाळ्यासाठी १,२०९ कोटींचे नियोजन करण्यात आले आहे.

“पुणे महानगराचा विकास हा भविष्यातील ५० वर्षांचा विचार करून केला आहे. मेट्रो, रिंग रोड आणि टीपी स्कीम्समुळे पुण्याची अर्थव्यवस्था अधिक गतिमान होईल आणि हे शहर देशातील सर्वाधिक राहण्यायोग्य महानगर म्हणून नावारूपास येईल.” — डॉ. योगेश म्हसे (IAS), महानगर आयुक्त, पीएमआरडीए.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"