पुण्यात एनडीआरएफचे ‘मोबिलायझेशन ड्रिल’; ‘पीडीआरएफ’ची दमदार कामगिरी!

पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाची आपत्ती व्यवस्थापन सज्जता सिद्ध
पुणे : “कोणतीही आपत्ती सांगून येत नाही, मात्र ती आल्यावर होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी ‘सज्जता’ हाच एकमेव पर्याय असतो.” याच ब्रीदवाक्याला जागत, पुण्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलातर्फे (NDRF) ‘वार्षिक मोबिलायझेशन ड्रिल २०२६’ चे यशस्वी आयोजन करण्यात आले. या सरावात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) अग्निशमन विभागाने म्हणजेच ‘पीडीआरएफ’ (PDRF) ने सक्रिय सहभाग नोंदवत, बचावकार्याचे उत्कृष्ट कौशल्य प्रदर्शित केले.

दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी संपूर्ण पुणे जिल्ह्यात एकूण १० वेगवेगळ्या ठिकाणी हे ड्रिल राबवण्यात आले. यामध्ये एनडीआरएफसोबतच स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि पोलीस प्रशासन यांनी एकत्रितपणे काम केले. विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक भक्कम करणे, हा या सरावाचा मुख्य उद्देश होता. या मोहिमेत पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या (पीडीआरएफ) टीमने तीन प्रमुख ठिकाणच्या बचावकार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. अत्यंत कठीण परिस्थितीत नागरिकांचे प्राण कसे वाचवावे, याचे दर्शन प्रात्यक्षिकांमधून घडवण्यात आले.
त्यामध्ये प्रामुख्याने जलमय भागातील बचाव (पुराच्या परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे तंत्र), ‘रोप रेस्क्यू’ द्वारे उंच इमारती किंवा खोल दरीतून अडकलेल्यांची सुटका करणे, तसेच रासायनिक, जैविक, किरणोत्सर्गी आणि आण्विक (CBRN) आपत्तींचा सामना करण्याची तांत्रिक तयारी यांबाबतची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. यामध्ये, लोणावळा येथील टायगर पॉईंट येथे रोप रेस्क्यूचे प्रात्यक्षिक घेण्यात आले, तर लोणी काळभोर येथे सीबीआरएन (केमिकल, बायोलॉजिकल, रेडिओलॉजिकल आणि न्यूक्लिअर) आपत्ती व्यवस्थापनाची मॉक ड्रिल पार पडली. तसेच, मुळशी धरण परिसरात वॉटर रेस्क्यूचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
“आपत्ती कोणतीही असो… सज्जता, समन्वय आणि टीमवर्क हाच यशाचा मंत्र आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देऊन नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत.” — *देवेंद्र पोटफाडे, मुख्य अग्निशमन अधिकारी, पीडीआरएफ (पीएमआरडीए, पुणे)

