महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेणाऱ्या दोन चोरट्यांना अटक!

पिंपरी : रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेणाऱ्या दोन चोरट्यांना मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून 28 हजार 500 ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिनेसह पाच लाख सात हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गणेश भारत गिरी (वय 22, रा. बीड), सुमित सोपान चव्हाण (वय 19 ,मेदनकरवाडी ,चाकण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार पिंपरी आणि दिघी येथे 8 फेब्रुवारी रोजी पायी जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून नेण्याची घटना घडली. या घटनांचा तपास मालमत्ता गुन्हे विरोधी पथक करत होते. या पथकाने आरोपी आलेल्या व गेलेल्या मार्गावरील सुमारे 200 ते 250 सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींची ओळख पटवली. ही चोरी पोलीस रेकॉर्ड मधील गुन्हेगार गणेश गिरी यांनी केल्या असल्याचे निष्पन्न झाले .त्यानुसार पोलिसांनी गणेश गिरी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 28.500 ग्रॅम वजनाचे चार लाख दहा हजार रुपये किमतीचे सोन्याच्या दागिने आणि दीड लाख रुपये किमतीची दुचाकी असा एकूण पाच लाख 60 हजारांचा ऐवज जप्त केला. पिंपरी, दिघी ,निगडी आणि चिखली परिसरात महिलांच्या गळ्यातील दागिने जबरदस्तीने चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले.
पिंपरी आणि दिघी येथील गुन्हे गणेश याने त्याचा साथीदार रोहन जाधव यांच्यासोबत मिळून केले. निगडी येथील गुन्हा पंकज गणेश दिवटे यांच्यासोबत तर चिखली येथील गुन्हा सुमित सोपान चव्हाण (वय 19 रा. मेदनकरवाडी, चाकण) आणि ओमकार रामेश्वर लाटे (रा नगर रोड बीड) यांच्यासोबत मिळून केल्याचे सांगितले. त्यातील सुमित चव्हाण याला अटक करून चिखली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गणेश गिरी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बीड, शिवाजीनगर, आंबेजोगाई तसेच पुणे शहरातील विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग देवकाते, हवालदार सोमनाथ मोरे, नितीन उंब्रजकर, पवन वाजे, मोहसीन अत्तार यांच्या पथकाने केली आहे.

