भूमी अभिलेख कर्मचा-यांचे आंदोलन १८ फेब्रुवारीपासून!

जमाबंदी आयुक्त पुणे कार्यालयावर २७ फेब्रुवारीला आक्रोश मोर्चा
पिंपरी : भुमि अभिलेख विभागातील कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्यभर कर्मचा-यांचे आंदोलन १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. दि २७ फेब्रुवारीला पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती भूमि अभिलेख कर्मचारी कृती समितीचे राज्य समन्वयक सुरज रामटेके यांनी दिली.

भुमि अभिलेख विभागातील कर्मचारी आक्रमक झाले आहेत. काम इंजिनिअरच वेतन कारकुनी, वेठबिगारासाख्या कामामुळे कर्मचाऱ्यात असंतोष आहे, त्यामुळे कृती समितीच्या वतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन होणार आहे. त्यासाठी सर्व कर्मचारी भुमि अभिलेख कर्मचारी कृती समिती या एका झेंड्याखाली एकत्र आले आहेत. दिनांक १७ डिसेंबर २०११ च्या अधिसूचनेनुसार विभागातील गट क भूकरमापक संवर्गाचे सेवा प्रवेश नियम प्रसिद्ध करण्यात आले त्यानुसार स्थापत्य अभियंत्यांना विभागात नियुक्ती देण्यात येते. परंतु वेतन मात्र लिपिकांचे देण्यात येते. त्यामुळे व्यथित होऊन कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र प्रशासकिय न्यायाधीकरण मुंबई खंडपीठ नागपूर येथे दाद मागितली.
न्यायाधिकरणाच्या दिनांक १४ जानेवारी २०२० चे आदेशानुसार शासनाने समिती गठित केली. समितीने सकारात्मक अहवाल देऊन ४ वर्षांचा कालावधी होऊनही अदयापही तांत्रिक वेतनश्रेणी लागू केली नाही. तसेच महसूलमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली जून महिन्यात बैठक झाली होती. त्यात कर्मचा-यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. मात्र, सहा महीने झाले असूनही मागण्या मान्य झाल्या नाहीत. शासनाकडून वेळकाढूपणा सुरू आहे. दिनांक १८ ते २० फेब्रुवारी रोजी भूमि अभिलेख कर्मचारी कार्यालयात मोजणी साहीत्य जमा करून काळया फिती लावून फक्त कार्यालयीन कामकाज करतील. दि. २३ ते २६ फेब्रुवारी या काळात सामुहीक रजा आंदोलन करतील. दि २७ फेब्रुवारीला जमाबंदी आयुक्त पुणे कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येईल.

