पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी रवि लांडगे तर उपमहापौरपदी शर्मिला बाबर बिनविरोध!

सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे तर विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची करण्यात आली नियुक्ती
पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचे रवि लक्ष्मण लांडगे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची महापौर पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तर शर्मिला बाबर यांची बिनविरोध उपमहापौर पदी निवड करण्यात आली. तसेच सभागृह नेतेपदी प्रशांत शितोळे आणि विरोधी पक्षनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पिठासीन अधिकारी दिपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिकेची विशेष सभा आज पार पडली. नगरसचिव मुकेश कोळप यांनी सुरूवातीस सभेच्या कामकाजाबाबत माहिती दिली. त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली.
महापौर व उपमहापौर पदाचा स्विकारला पदभार
महापौर रवि लांडगे व उपमहापौर शर्मिला बाबर यांची निवड झाल्यानंतर त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी आमदार उमा खापरे, अमित गोरखे, महेश लांडगे, शंकर जगताप यांनी शहरवासीयांच्या वतीने त्यांचा सन्मान केला. तर महापालिका प्रशासनाच्या वतीने पिठासीन अधिकारी तथा सहकार आयुक्त दिपक तावरे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्यांचा सन्मान केला. यावेळी नवनिर्वाचित नगरसदस्य, नगरसदस्या यांच्यासह अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, तृप्ती सांडभोर, विक्रांत बगाडे, नगरसचिव मुकेश कोळप, सह आयुक्त मनोज लोणकर, उप आयुक्त अण्णा बोदडे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड तसेच विविध विभागांचे अधिकारी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेला सुरूवात झाली.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण
यावेळी सर्वसाधारण सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर तसेच सभागृह नेते प्रशांत शितोळे यांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केले. त्यानंतर नगरसदस्य शत्रुघ्न काटे यांनी महापालिकेची सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत स्थगित करण्याबाबत सूचना मांडली. या सूचनेला नगरसदस्य राजू मिसाळ यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर महापौर रवि लांडगे यांनी सर्वसाधारण सभा २० फेब्रुवारी २०२६, दुपारी १ वाजेपर्यंत तहकूब केली.

