महापालिका हद्दीतील लक्ष्मी चौक ते आकुर्डी, रावेत रस्त्यावर नागरिकांची दुतर्फा गर्दी!

बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’
पिंपरी : ढोल-ताशांचा निनाद, टाळ्यांचा गजर आणि उत्साहाची लाट अशा जल्लोषपूर्ण वातावरणात पिंपरी चिंचवडकरांनी ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचे जल्लोषात स्वागत केले. वेग, शिस्त आणि खेळभावनेचा संगम असलेली ही स्पर्धा नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सायकलपटूंचे पिंपरी चिंचवड शहरात आगमन होताच लक्ष्मी चौक ते आकुर्डी या मार्गावर ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांची हजारोंच्या संख्येने दुतर्फा गर्दी जमली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेने या स्पर्धेच्या अनुषंगाने जय्यत तयारी करीत शहरातील प्रमुख मार्गांसह तसेच चौकांमध्ये ठिकठिकाणी फुलांची आकर्षक सजावट केली होती.
‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याला प्रचंड उत्साहात सुरुवात झाली. टी.सी.एस. सर्कल, हिंजवडी येथून सुरू झालेल्या या टप्प्याचा समारोप डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट, आकुर्डी, रावेत येथे झाला. याठिकाणी स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील विजेत्यांचा सन्मान खासदार मेधा कुलकर्णी, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, शंकर जगताप, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी यांच्या हस्ते करण्यात आला.

‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील एकूण अंतर ९१.८ किलोमीटर होते. या टप्प्याची सुरुवात टी.सी.एस.सर्कल, हिंजवडी येथून झाली. स्पर्धा सुरू असतानाच रस्त्यांवर सायकलपटू वेग आणि क्षमतेचा सुरेख मिलाफ सादर करताना दिसले. काही ठिकाणी तीव्र वळणे, चढ-उतार असल्याने स्पर्धकांसमोर आव्हाने होती. मात्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकलपटू आत्मविश्वासाने ही आव्हाने पेलताना दिसून आले. मार्गावरील ठरावीक ठिकाणी वैद्यकीय मदत, रुग्णवाहिका, तांत्रिक मदत वाहने तसेच रिफ्रेशमेंट पॉइंट्स सज्ज ठेवण्यात आले होते. ड्रोन, सीसीटीव्ही कॅमेरे आणि मोटरसायकल पथकांच्या माध्यमातून सातत्याने स्पर्धा परिसराचे निरीक्षण करण्यात येत होते.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील लक्ष्मी चौक येथे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सायकलपटूंचे आगमन होताच त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. हे सायकलपटू लक्ष्मी चौक–भूमकर चौक–डांगे चौक–श्री संत नामदेव महाराज चौक मार्गे आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील आंतरराष्ट्रीय इन्स्टिट्यूट येथे पोहोचले. यावेळी लक्ष्मी चौक ते आकुर्डी या मार्गावर खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी होती. स्पर्धेच्या समारोपस्थळी सायकलपटूंचे पिंपरी चिंचवडकरांनी जल्लोषात स्वागत केले आणि त्यांना प्रोत्साहन दिले. विशेष करून यावेळी तरुणाई मोठ्या संख्येने उपस्थित होती.
स्पर्धेतील विजेते
प्रथम – मॉडगवे लोके (Modgway Loke)
द्वितीय – सँटी आर्ने (Santy Arne)
तृतीय – जॉर्जिओस (Georgios )
बेस्ट इंडियन रायडर – हशवीर सिंग (Hashveer Singh)
बेस्ट यंग रायडर – स्पिएरो तामार (Spiero TaMar)
बेस्ट एशियन रायडर – साइनबायर (Saainbayarr)
किंग ऑफ माऊंटन – रायलेआनू क्रिस्टियन (Raileanu Cristian)

