पाच दुचाकी चोरी प्रकरणी अल्पवयीन मुलगा ताब्यात!

पिंपरी: पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेने मोटर सायकल चोरीचे पाच गुन्हे उघड करून दोन लाख 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांच्या पथकाद्वारे करण्यात आली. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

पिंपरी चिंचवड हद्दीतील संत तुकाराम नगर, एमआयडीसी भोसरी, चिंचवड पोलीस स्टेशन, व खोपोली स्टेशन हद्दीतील दुचाकी चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिटने दोन पथके तयार करून ज्या भागातून दुचाकी चोरीला गेल्या त्या भागातील तब्बल दीडशे पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तांत्रिक तपासणी केली. आरोपी हे मुख्य रस्त्याचा वापर न करता रस्ते बदलून आड मार्गाने जात होते. मिळालेल्या फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून दोन संशयीतांना निष्पन्न करून आरोपीच्या घराची पत्ते शोधण्यात आले. हे दुचाकी चोर अल्पवयीन असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्या नातेवाईका समक्ष अल्पवयीन बालकांची विचारपूस करण्यात आली. त्यांनी आंबेडकर पुतळा, संत तुकाराम नगर, एमआयडीसी भोसरी, चिंचवड तसेच खोपोली रेल्वे स्टेशन परिसरातून दुचाकी चोरी केल्याचे सांगितले.
त्यांच्याकडून चोरी केलेल्या पाच मोटर सायकली जप्त करण्यात आल्या असून पाच गुन्हे उघड केले आहेत. एकूण दोन लाख 90 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मुळीग, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे, पोलीस हवालदार जयवंत राऊत, देवा राऊत, अजय डगळे, सागर अवसरे, मारुती करसुंडे, महिला पोलीस हवालदार उषा दळे, पोलीस शिपाई लक्ष्मीकांत पतंगे, विजय जानराव, तेजस भालचिम, सोहल चिखलकर, संदेश देशमुख, उद्धव खेडकर, दीपक तांदळे यांनी ही कारवाई केली.

