तडीपारीचे उल्लंघन करत एका महिलेवर बलात्कार!

पिंपरी : पिंपरी चिंचवड व पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलेल्या एका गुंडाने तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात प्रवेश करून एका महिलेवर बलात्कार केला. ही घटना 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास चिंबळी फाटा परिसरात घडली.

फारूक सत्तार शेख (वय 25, रा बालाजी नगर, भोसरी) असे आरोपीचे नाव आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याला 8 एप्रिल 2024 रोजी पिंपरी चिंचवड सह पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले आहे. तो एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बालाजी नगर झोपडपट्टीत वास्तव्यास होता. आरोपी गेल्या दोन महिन्यापासून तडीपार आदेशाचे उल्लंघन करून आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंबळी फाटा परिसरात राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. 18 डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आरोपीने एका 40 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेने सहा दिवसानंतर आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. या प्रकरणानंतर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
तडीपार आरोपीवर आवश्यक ती निगराणी न ठेवल्याबद्दल पोलीस अंमलदार भागवत शेप यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तडीपार आरोपींवर लक्ष ठेवण्यासाठी ‘दत्तक योजना’ राबवली जाते. त्यानुसार आरोपी फारुक शेख यांची जबाबदारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यातील पोलिस अंमलदार भागवत शेप यांच्याकडे देण्यात आली होती. संबंधित अंमलदारावर आरोपीचे लोकेशन तपासणे व तडीपारी आदेशाचे पालन होते की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी होती.

