डॉ. आनंद यादव यांनी ग्रामीण वास्तव आपल्या साहित्यातून साकारल : डॉ. अश्विनी धोंगडे

‘आनंदयात्री’ला उत्तम प्रतिसाद
पिंपरी : ‘डॉ. आनंद यादव यांनी ग्रामीण वास्तव आपल्या साहित्यातून साकारले!’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिका डॉ. अश्विनी धोंगडे यांनी स्व. दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था सभागृह, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक ३० नोव्हेंबर रोजी केले. समरसता साहित्य परिषद आणि डॉ. आनंद यादव अभ्यास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘आनंदयात्री’ या डॉ. आनंद यादव यांच्या ९०व्या जन्मदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. अश्विनी धोंगडे बोलत होत्या. ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री गिरीश प्रभुणे, लेखिका प्रा. डॉ. कीर्ती मुळीक, ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक हरिहर कुलकर्णी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. अश्विनी धोंगडे पुढे म्हणाल्या की, ‘डॉ. आनंद यादव हे साठोत्तरी साहित्य प्रवाहातील एक महत्त्वाचे साहित्यिक होते. ग्रामीण भागातील जीवनाचे चित्रण मध्यमवर्गीय पांढरपेशी दृष्टिकोनातून केले जात होते; परंतु चित्रमय शैली अन् ग्रामीण बोली ही लेखनवैशिष्ट्य असलेल्या चतुरस्र प्रतिभेच्या यादव यांनी शहरी वाचकांना ग्रामीण भागातील खरेखुरे जग दाखवले. त्यांच्या लेखनाची नाळ महात्मा फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा असूड’शी जोडलेली होती; तसेच भारत हा बहुमुखी खेड्यांचा देश आहे हा महात्मा गांधींचा संदेशही त्यांनी लेखनातून अधोरेखित केला. त्यांनी ध्यास घेऊन ग्रामीण साहित्य चळवळ रुजवली. त्यामुळे वास्तव ग्रामीण साहित्य लिहिणाऱ्या अनेक नवोदितांना आत्मविश्वास मिळाला. मात्र, आनंद यादव यांच्या कसोटीच्या काळात लेखकांनी त्यांची पाठराखण केली नाही, हा अपराधगंड मनात आहे.
‘ गिरीश प्रभुणे यांनी, ‘डॉ. आनंद यादव यांच्या स्वानुभवातील वास्तव लेखनापासून प्रेरणा घेऊन बहुजन समाजातील मोठा वर्ग लिहिता झाला. विशेषत: मराठा शेतकरी समाजाच्या व्यथा, वेदनांचे अस्सल चित्रण त्यांच्या साहित्यात आढळल्याने ग्रामीण भागात वाचकवर्ग निर्माण करण्याचे श्रेय त्यांना जाते. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने ‘आनंदयात्री’ होते!’ असे विचार व्यक्त केले. डॉ. कीर्ती मुळीक यांनी, ‘डॉ. आनंद यादव यांनी साहित्यातील नागरी आणि ग्रामीण ही दरी मिटविण्याचे काम केले. त्यामुळे आजच्या काळात डॉ. आनंद यादव अभ्यास मंडळाची नितांत गरज आहे!’ असे मत मांडले. हरिहर कुलकर्णी यांनी, ‘गतिमान तंत्रज्ञानाचा अफाट वेग साहित्यात पकडणे दुरापास्त आहे. महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडत असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे अपरिमित नुकसान होत आहे!’ अशी खंत व्यक्त केली.
अखंड भारतमाता, राष्ट्रीय महापुरुष व डॉ. आनंद यादव यांच्या प्रतिमांचे पूजन करून आणि सुहास घुमरे यांनी सादर केलेल्या ‘ती पोर झिम्मा खेळते…’ या ग्रामीण ढंगातील कवितेच्या सादरीकरणाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. समरसता साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्षा मानसी चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. यावेळी समरसता साहित्य परिषद, पुणे महानगर शाखेच्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अभिवाचन सत्रात हेमंत जोशी, मंगला पाटसकर, दत्तात्रय मस्के, ऋचा कर्वे, अशोक होनराव आणि श्रद्धा चटप यांनी आनंद यादव यांच्या कवितांचे अभिवाचन केले. माधवी देवळाणकर यांनी यादव यांच्या ‘सासुरवाशीण’ या कथेचे अभिवाचन केले; तर मोनिका बागडे यांनी मानसी चिटणीस यांनी आनंद यादव यांना लिहिलेल्या हृद्य पत्राचे अभिवाचन केले. कविवर्य चंद्रकांत चाबुकस्वार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात सोमनाथ सुतार (बारामती), सोमनाथ टकले (करमाळा), जनार्दन धुमाळ (माढा), वैशाली गावंडे (अमरावती), राजेश चौधरी (चंद्रपूर) आणि संजय माने (सांगली) या कवींनी ग्रामीण बोलीभाषेतील कवितांच्या प्रभावी सादरीकरणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
शोभा जोशी, राजेंद्र भागवत, नीलेश शेंबेकर, जयश्री श्रीखंडे, सुप्रिया लिमये, स्वाती भोसले, पुष्कर भातखंडे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. स्नेहा पाठक आणि उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. जनार्दन भोसले यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता सुप्रिया लिमये यांनी गायलेल्या ‘वंदेमातरम्’ने करण्यात आली.

