महात्मा फुले यांनी समाजाला दाखवला शिक्षणातून प्रगतीचा मार्ग : डॉ. सुखदेव थोरात

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित महात्मा जोतीराव फुले स्मृतीदिन प्रबोधन कार्यक्रम
पिंपरी : समाजातील प्रत्येकाला सर्वत्र समान वागणूक, समान शिक्षण हा विचार घेऊन महात्मा जोतीराव फुले यांनी आयुष्यभर कार्य केले तर त्यांच्या या विचारधारेचा वारसा पुढे घेऊन जाण्याचे काम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. महात्मा फुले यांचा सर्वांना समान संधीचा, समान शिक्षणाचा विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानात मांडला असे मत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ व विद्यापीठ अनुदान आयोग माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी व्यक्त केले.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिनानिमित्त एक दिवसीय प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळच्या सत्रातील व्याखानात ‘महात्मा फुले यांचे शैक्षणिक धोरण आणि सामाजिक क्रांती’ या विषयावर डॉ. सुखदेव थोरात बोलत होते.
डॉ. सुखदेव थोरात म्हणाले की, महात्मा फुले यांच्यावर थॉमस पेन व जॉन स्टुअर्ट मिल यांच्या मानवी हक्कांच्या विचारांचा पगडा होता.याच मार्गावर चालत महात्मा फुले यांनी देशात सामाजिक क्रांतीची सुरवात करत आयुष्यभर मानवी हक्कांसाठी लढा दिला. त्यांनी आपल्या कार्यकाळात सामाजिक समता निर्माण करणे, सर्वांना समान संधी व स्त्री शिक्षणाचे महत्वाचे कार्य केले. स्त्री शिक्षणाचे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांना शिक्षणाचे धडे दिले. त्यांना देशाच्या पहिल्या महिला शिक्षिका बनवले. शिक्षणातील असमानता दूर करण्यासाठी शाळा काढल्या. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या त्यागाच्या जोरावर महिलांना समाजात मानाचे स्थान मिळाले. आज महिला सर्वच क्षेत्रात आघाडीवर दिसून येत आहेत.
महाराष्ट्राला संत नामदेवांपासून संत तुकाराम महाराज यांच्यापर्यंत मोठी संत परंपरा आहे. समाजातील सामाजिक विषमता दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या संत साहित्यांच्या माध्यमातून प्रयत्न केले आहेत. सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी तोच वारसा राजर्षी शाहू महाराज, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी पुढे चालवला. आपल्यालाही तोच वारसा पुढे घेऊन जायचा आहे. देशातील प्रत्येकासाठी विवेकवादी, तर्कवादी, विज्ञानवादी, अनुभवाने मिळणारे, नैतिक शिक्षण असावे. शिक्षणाचा मुख्य उद्देश व्यक्तिमत्व बनविणारे असावे. असे स्पष्ट मत डॉ. सुखदेव थोरात यांनी मांडले.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले स्मृतिदिनानिमित्त आयोजित प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात शिरीष पवार, प्रवीण ढोणे, आबासाहेब आठखिळे, विक्रांत शिंदे व सहकारी यांनी ‘जागर क्रांतिसूर्याचा’ कार्यक्रम सादर केला. यामध्ये महात्मा फुले यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर या गुरु शिष्यासह गौरव गीतांसह सामाजिक समतेचा संदेश देणारी ‘कष्ट केले माझ्या भीमाने’, ‘काळाराम मंदिर चवदार तळे’, ‘सांग सांग जोतीबा कसे फेडू तुझे पांग’, ‘ पेटती मशाल’, ‘आले महात्मा फुले मुलींचे शिक्षण केले खुले’, ‘२ वर्ष ११ महिने १८ दिवस लिहलं संविधान’, रथ समतेचा, ‘स्त्री मुक्तीला जन्म दिला’ अशी गाणी सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत विक्रांत शिंदे यांनी मंचावर प्रवेश करत डॉ. बाबासाहेबांचे विचार समजावून सांगितले. यावेळी नागरिकांनी भावनापूर्ण पद्धतीने टाळ्यांच्या गजरात त्यांना प्रतिसाद दिला.

