आपण आत्मविश्वासातून स्वतःला घडवू शकतो : डॉ. सीमा काळभोर

चौथे इंद्रायणी साहित्य संमेलन
पिंपरी : ‘आपण आत्मविश्वासातून स्वतःला घडवू शकतो आणि कोणाचा आदर्श होऊ शकतो!’ असा विश्वास संमेलनाध्यक्षा डॉ. सीमा काळभोर यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून उपस्थितांना दिला.

इंद्रायणी साहित्य परिषद आयोजित चौथ्या इंद्रायणी साहित्य संमेलनात लेखिका प्रा. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून संमेलनाध्यक्षा डॉ. सीमा काळभोर यांच्याशी सुसंवाद साधला. याप्रसंगी स्वागताध्यक्ष नीलेश बोराटे, इंद्रायणी साहित्य परिषदेचे संस्थापक अरुण बोऱ्हाडे, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सीमा काळभोर आपली वाटचाल कथन करताना म्हणाल्या की, ‘फुरसुंगी या छोट्याशा गावात शेवाळे या उच्च मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. शेतकरीकन्या असल्याने बालपणापासून मला शेतीतील सर्व कामे करता येतात अन् त्याचा सार्थ अभिमानदेखील वाटतो. माध्यमिक शाळेत असताना वाचनाची आवड लागली. तसे पाहता साहित्याचे सर्व प्रकार मला वाचायला आवडतात; व. पु. काळे हे माझे अत्यंत आवडते लेखक आहेत; तसेच त्यांचे ‘वपुर्झा’ हे सर्वात आवडते पुस्तक आहे; कारण त्या पुस्तकाचे कोणतेही पान उघडून वाचायला सुरुवात की, मनाला एक प्रसन्न अनुभूती लाभते. विवाहप्रसंगी मी बी. ए. ची पदवीधर होते. सुदैवाने माहेरी आणि सासरी ज्येष्ठांसह कुटुंबात अनेक सदस्य असल्याने एकत्र कुटुंबपद्धतीत वावरता आले.
सासूबाईंच्या प्रोत्साहनाने मी एम. ए. ची पदवी मिळवली. त्यानंतर प्रा. डॉ. राजा दीक्षित सरांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय शिस्तीत १९व्या शतकाचा उत्तरार्ध आणि २०व्या शतकाचा पूर्वार्ध या कालखंडातील सहकार चळवळीचा मी सखोल अभ्यास केला. त्यामध्ये पुणे जिल्ह्यात अण्णासाहेब मगर यांचे सहकार क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे, असे आढळून आले. त्यांच्या योगदानावर मी प्रबंध सादर केला. त्या प्रबंधासाठी मला विद्यावाचस्पती (पीएच. डी.) ही पदवी प्रदान करण्यात आली. पुढे हा प्रबंध ग्रंथरूपात प्रकाशित झाला. त्या ग्रंथाला लोकनेते आदरणीय शरदचंद्र पवार यांची प्रस्तावना लाभली आहे. उच्च शिक्षणाच्या काळात माझे गुरू प्रा. डॉ. राजा दीक्षित सरांच्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वमुळे मला मौलिक मार्गदर्शनाचा लाभ झाला.
आजवरच्या जीवनातील वाटचालीचा आढावा घेताना स्वतःवर विश्वास असल्याने मी प्रयत्नपूर्वक स्वतःला घडवू शकले आणि आपणही कोणाचे आदर्श होऊ शकतो, हा आत्मविश्वास मला आला आहे. या वाटचालीत मला वाचनाचा प्रचंड फायदा झाला. वाचनातून लेखनाची आवड लागली. त्यातून माझी चार पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. आत्ता ‘साधनेचा तेजोदीप’ हे पुस्तक लवकरच वाचकांच्या भेटीला येणार आहे. याशिवाय अजून दोन पुस्तकांचे लेखन सुरू आहे!’ मुलाखतीदरम्यान डॉ. सीमा काळभोर यांनी प्रा. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांच्या मार्मिक प्रश्नांना हजरजबाबीपणे उत्तरे दिलीत. प्रा. डॉ. संगीता थोरात यांनी आभार मानले.

