संतसाहित्य शिक्षणपद्धतीत येणे गरजेचे : डॉ. विजय लाड

प्रकाश उपासनी लिखित; आठवणींच्या वाटेवर…’ प्रकाशित’
पिंपरी : ‘२०४७ मध्ये भारताला विश्ववंदित राष्ट्र करायचे असेल तर संतसाहित्य शिक्षणपद्धतीत येणे गरजेचे आहे’ असे विचार शिवथरघळ येथील श्री सुंदर मठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी मनोहर सभागृह, ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी प्राधिकरण येथे शनिवार, दिनांक २२ नोव्हेंबर रोजी व्यक्त केले. प्रकाश उपासनी लिखित, संवेदना प्रकाशन निर्मित आणि मातृमंदिर विश्वस्त संस्था आयोजित ‘आठवणींच्या वाटेवर…’ या आत्मचरित्रपर कादंबरीचे प्रकाशन करताना डॉ. विजय लाड बोलत होते.

मातृमंदिर विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष नितीनभाई कारिआ, कार्यवाह डाॅ. मनोज देवळेकर, उपाध्यक्षा शारदा चोरडिया, उपक्रम संयोजक सुधीर कुलकर्णी, सुभाष देशपांडे, लेखक प्रकाश उपासनी, प्रकाशक नितीन हिरवे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
डॉ. विजय लाड पुढे म्हणाले की, ‘संतांनी मानवी जीवनातील सूक्ष्म व्यवहाराचा साक्षेपाने विचार केला आहे. ‘ज्ञानेश्वरी’ आणि ‘दासबोधा’त विज्ञानाचे अनेक दाखले आढळतात. उच्चशिक्षित असलेल्या प्रकाश उपासनी यांनी आपल्या आत्मचरित्रात संत तुकोबांचे संदर्भ उद्धृत केले आहेत!’ नितीन हिरवे यांनी, ‘पूजनीय वा. ना. तथा भाऊ अभ्यंकर यांनी संतविचार अन् संस्कार रुजवलेल्या संस्थेत त्यांच्या पश्चात आलेला पुस्तक प्रकाशनाचा योग म्हणजे त्यांचे आशीर्वादच आहेत, अशी आमची नम्र भावना आहे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी लेखक प्रकाश उपासनी यांनी आपल्या मनोगतातून, ‘मुल्हेरसारख्या छोट्या खेड्यातून वाटचाल करीत जिद्दीने रशियन भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यामुळे महाविद्यालयात आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातही रशियन भाषेचे अध्यापन करण्याची संधी मिळाली. तसेच विविध आस्थापनांमध्ये दुभाषक म्हणून आंतरराष्ट्रीय अभ्यागतांशी सुसंवाद साधता आला. एवढेच नव्हे तर रशियामधील मास्को येथे जाण्याची संधी मिळाली. यासाठी पूर्वजांचा आध्यात्मिक वारसा पाठीशी आहे!’ अशा भावना व्यक्त केल्या.
चंद्रशेखर जोशी, मीना उपासनी, मनोज मोरे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. अभिलेखा शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष देशपांडे यांनी आभार मानले. “बोलावा विठ्ठल…” या भक्तिगीताने कार्यक्रमाचा प्रारंभ आणि “रत्नाकरा…” या प्रार्थनेने समारोप करण्यात आला.

