ड्राय डे ला दारू विक्री, हॉटेल मालकासह चौघांवर गुन्हा दाखल!

पिंपरी : ड्राय डे असताना आणि दारू विक्रीचा कोणताही वैध परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दारू विक्री करणाऱ्या हॉटेल मालकासह मॅनेजर आणि जागा मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि २ ) रात्री पावणेनऊ वाजण्याच्या सुमारास हिंजवडी, साखरेवस्ती येथील हॉटेल बॉटम्सअप येथे करण्यात आली.
हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिस अंमलदार अजित शिंदे यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार हॉटेल मालक परशुराम मोनाप्पा धामनेकर (वय ४८, निगडी), मॅनेजर हनुमंत सायबा कांबळे (वय ३७, साखरेवस्ती हिंजवडी) आणि जागा मालक पंकज विजय साखरे व शुभम विजय साखरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल मालक तसेच मॅनेजर यांनी ‘ड्राय डे’ असताना आणि दारू विक्री करण्याचा कोणताही वैध परवाना नसताना स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेल बॉटम्सअपमध्ये ४४ हजार ८६५ रुपये किमतीची दारू विक्री करताना ते आढळून आले. तसेच, हॉटेल मालकाकडे दारू विक्रीचा वैध परवाना नाही हे माहित असताना देखील जागा मालक संशयितांनी त्यांची जागा हॉटेल चालवण्यासाठी आणि दारू विक्रीसाठी भाड्याने उपलब्ध करून दिली.

पैशांवर जुगार खेळणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल!
पिंपरी : जुगार खेळणाऱ्या चार व्यक्तींना महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी पकडून त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला. ही कारवाई सोमवारी (२) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एच पी चौकात, एस. के हॉटेलच्या बाजूला, वासुली रोडला मोकळ्या जागेत, महाळुंगे येथे करण्यात आली.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पोलिस अंमलदार राजकुमार हनुमंते यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रामा लक्ष्मण माईनकर (वय ३८, महाळुंगे), वसंतकुमार रामसागर राय (वय ४२, महाळुंगे), अब्दुल सत्तार चांद शेख (वय ४८, महाळुंगे) आणि युसुफ इस्माईल शेख (वय ५३, महाळुंगे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयित ‘काळा पिवळा ५ स्टार कार्ड’ नावाचा जुगार खेळताना आणि चालवताना मिळून आले. हा जुगार ‘शिवा पवार’ नावाचा इसम चालवत असल्याचे समजले आहे, परंतु त्याचा पूर्ण पत्ता माहीत नाही.

