दहा कोटींच्या चिनी फटाक्यांची तस्करी पकडली!

नवी दिल्ली : भारताच्या सीमांवरून चिनी फटाक्यांची बेकायदेशीर आयात करण्याचा मोठा डाव महसूल गुप्तचर संचालनालयाने ( डीआरआय) हाणून पाडला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात अवैधरित्या चिनी फटाके आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या तस्कर टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून सुमारे दहा कोटी रुपये किमतीचे तब्बल एक लाख तीस हजार फटाके जप्त करण्यात आले आहेत.

तपासांती या तस्करी मागे असलेल्या टोळीचा शोध लागला असून गुजरात मधील वेरावल येथे एका मुख्य संशयी त्याला अटक करण्यात आली आहे . या टोळीच्या ताब्यातून बेकायदेशीर कागदपत्रे आणि साठवणूक यंत्रणेचे पुरावे हस्तगत करण्यात आले आहेत . “ऑपरेशन फायर ट्रेल” या विशेष मोहिमेंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून देशातील दोन प्रमुख बंदरावरून ही तस्करी उघडकीस आली आहे. डीआर आय च्या अधिकाऱ्यांनी न्हावासेवा बंदरात चीनहून आलेल्या एका कंटेनरची कसून तपासणी केली. यामध्ये वरच्या थरावर कपडे ठेवले होते, पण खोलवर पाहणी केल्यानंतर 46,640 चिनी फटाके आढळून आले. या खेपाची अंदाजीत किंमत 4 कोटी 82 लाख रुपये आहे . याच प्रमाणे तुतीकोरीन बंदरावर देखील डीआयआरने दुसऱ्या कारवाईत 83 हजार 520 चिनी फटाके जप्त केले आहेत .या फटाक्यांना इंजीनियरिंग गुड्स म्हणून चुकीचे लेबल लावून देशात आणण्याचा प्रयत्न केला जात होता .
विदेश व्यापार धोरणानुसार फटाक्यांची आयात प्रतिबंधित असून त्यासाठी डीजीएफटी आणि पेट्रोलियम व स्फोटक सुरक्षा संघटनेच्या मान्यतेची आवश्यकता असते .अशा धोकादायित वस्तूंची आयात केवळ कायदा विरोधीच नाही तर राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही गंभीर धोका ठरू शकते.

