फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
कला साहित्य

अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘सुर’, ‘शब्द’ आणि ‘शौर्य’ यांचा संगम!

अभिजात मराठी भाषा सप्ताहात ‘सुर’, ‘शब्द’ आणि ‘शौर्य’ यांचा संगम!

कार्यक्रमांतून मराठी चित्रपटसृष्टी, रंगभूमी आणि लोककलेचा उभा राहिला अभिमान
पिंपरी : मराठी भाषेचा गंध, चित्रपटसृष्टीचा तेजोमय प्रवास आणि सुरांचा सुवास… या त्रिवेणी संगमातून ‘अभिजात मराठी भाषा सप्ताहात’ एक अविस्मरणीय सांस्कृतिक क्षण उजाडला. चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहामध्ये झालेल्या ‘राजा हरिश्चंद्र ते हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या कार्यक्रमातून रुपेरी पडद्यावरच्या मराठी चित्रपटांचा शंभरहून अधिक वर्षांचा इतिहास सुरेल गाण्यांच्या माध्यमातून रसिकांसमोर उलगडला गेला आणि एकप्रकारे रसिकांनी या स्वरयात्रेतून चित्रपटसृष्टीचा प्रवासच अनुभवला. तर मराठी नाटक ‘सूर्याची पिल्ले’ आणि शाहिरी पोवाड्यांचा कार्यक्रम ‘गजर मराठीचा…. जागर शाहिरीचा’ या कार्यक्रमांना देखील प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी चिंचवड शाखा यांच्या सहकार्याने, तसेच श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय, भोसरी आणि हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय, चिंचवड यांच्या सहभागातून ३ ते ९ ऑक्टोबर २०२५ दरम्यान ‘अभिजात मराठी भाषा सप्ताह’ साजरा होत आहे.

या कार्यक्रमात सुरेल गाण्यांचे सादरीकरण करीत रसिकांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या १९१३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘राजा हरिश्चंद्र’ चित्रपटापासून आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या चित्रपटापर्यंत नेले. बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीचे चित्रपटसृष्टीसाठी योगदान, प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापनेची प्रेरणादायी कथा, पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’ याचे स्मरण, या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीचा पाया पुन्हा एकदा उजळवला.

यानंतर व्ही. शांताराम यांच्या कलादृष्टीचा परिचय, पु. ल. देशपांडे यांचे मानवी भावनांना स्पर्श करणारे चित्रपट, ग. दि. माडगूळकर आणि सुधीर फडके यांच्या चित्रपटसंगीतासाठीचे योगदान, पं. हृदयनाथ मंगेशकर यांचे संगीत, आणि दादा कोंडके यांच्या हास्यविनोदाने सजलेले मराठीपण, या सगळ्यांचा संगीतमय पट रसिकांसमोर उलगडला.

‘हृदयी प्रीत जागते’, ‘माझं ठरल्यालं लगीन मोडलं गं’, ‘ग साजणी’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’, ‘मन उधाण वाऱ्याचे’ अशी अनेक अजरामर गाणी कलाकारांनी सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. १९८० च्या दशकातील विनोदी आणि भयपट यांचा संगम, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अभिनयाचे सुवर्णक्षण, आणि किशोरकुमार यांनी पहिले गायलेले मराठीतील गाणे, यांसह मराठी सिनेमाची उत्क्रांती रसाळ शैलीत कलाकारांनी रसिकांसमोर उलगडली.

२००० नंतरच्या काळात इतिहास, चरित्र आणि सामाजिक वास्तव सांगणारे ‘कट्यार काळजात घुसली’, ‘नीलकंठ मास्तर’, ‘महाराष्ट्र शाहीर’ यांसारखे चित्रपट मराठी सिनेमा नव्या उंचीवर घेऊन गेले, हेही यावेळी अधोरेखित करण्यात आले. संगीतकार अजय–अतुल यांच्या सुरेल मेडलेने कार्यक्रमाचा उत्कर्षबिंदू साधला. ‘लखलख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया’ या गाण्याने मराठी चित्रपटसृष्टीतील प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ तसेच या चित्रपटसृष्टीसाठी योगदान देणाऱ्या प्रत्येकाला मानाचा मुजरा करण्यात आला.

संजय चांदगुडे व प्रशांत बरीदे यांनी उत्कृष्ट निवेदन केले. गायक समीर नगरकर, पियुष भोंडे, अजय खटावकर, प्रशांत व्ही. साळवी, अजिंक्य देशपांडे, गायिका शुभ्रा घायतडके, निशा गायकवाड, सुवर्णा कोळी, प्रियल निळे, सावनी सावरकर यांनी विविध गाण्यांचे सादरीकरण केले. त्यांना वादक अमृता दिवेकर, अमन सय्यद, विशाल थेलकर, सचिन वाघमारे, अभिजित भदे, नागेश भोसेकर, हर्षद गणबोटे यांनी साथ दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"