पिंपरी चिंचवड पोलिसांनी २३ कोटींचे अंमली पदार्थ केले नष्ट!

पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ६६२ किलो ४५५ ग्रॅम गांजा आणि १९ किलो ९९७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) असा एकूण २३ कोटी ३० लाख रुपयांचे अंमली पदार्थ नष्ट केले. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत वेगवेगळ्या ९० कारवयांमध्ये हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केलेले अंमली पदार्थ नष्ट करण्यासाठी प्रादेशिक अंमली पदार्थ नाश समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड आहेत. तर समितीमध्ये सदस्य म्हणून पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, संदीप आटोळे आणि डॉ. शिवाजी पवार हे आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांनी वेगवेगळ्या ९० कारवयांमध्ये तीन कोटी ३१ लाख २२ हजार ७५० रुपये किमतीचा ६६२ किलो ४५५ ग्रॅम गांजा आणि १९ कोटी ९९ लाख ७० हजार रुपये किमतीचे १९ किलो ९९७ ग्रॅम मॅफेड्रॉन किलो जप्त केले होते.
आपल्या आसपास कोणी अंमली पदार्थ विक्री करत असेल तर थेट पोलिसांना कळवावे. – संतोष पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंमली पदार्थ विरोधी पथक
रांजणगाव एमआयडीसी येथे केले अंमली पदार्थ नष्ट!
अंमली पदार्थ नाश समितीच्या संमतीने हे अंमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. रांजणगाव एमआयडीसी येथील महाराष्ट्र एन्व्हायरो पावर लिमिटेड या कंपनीमध्ये हे अंमली पदार्थ सोमवारी (२९ सप्टेंबर) नष्ट करण्यात आले. यावेळी पिंपरी चिंचवड पोलिसांचे अंमली पदार्थ विरोधी पथक, प्रादेशिक न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा पुणे, राज्य उत्पादन शुल्क पुणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पुणे या संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

