जागा खरेदी विक्री प्रकरणात २ कोटी ४० लाखांची फसवणूक!

पिंपरी :एका महिलेकडून घेतलेल्या जमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून परस्पर दुसऱ्या लोकांना विक्री करून २ कोटी ४० लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मार्च २०२५ ते सोमवार (२९ सप्टेंबर) या कालावधीत मारुंजी, मुळशी येथे घडली.
या प्रकरणी एका महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जी. अनिलकुमार गुजुला (मारुंजी, मुळशी), नरेंद्र फकिरा गिरी (पिंपळे सौदागर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे भाऊ अमोल दत्तात्रय देशमुख यांनी मारुंजी येथील सहा गुंठे जागा तिघांकडून कुलमुखत्यार पत्र आणि साठेखताने लिहून घेतली होती. मात्र आरोपी जी अनिलकुमार आणि नगेंद्र गिरी यांनी ही जागा परस्पर दुसऱ्या लोकांना बनावट कागदपत्रे बनवून विक्री केली. या व्यवहारात फिर्यादी महिलेची दोन कोटी ४० लाखांची फसवणूक झाली. हिंजवडी पोलिस तपास करत आहेत.

कारच्या धडकेत ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू!
पिंपरी : भरधाव वेगात कार चालवून एका अज्ञात चालकाने पादचारी वृद्धास धडक दिली. यात त्या वृद्धाच्या डोक्यास व छातीस गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (२९ सप्टेंबर) सकाळी चिखली येथील नेवाळेवस्ती येथे संजय नेवाळे यांच्या घरासमोर घडली.
नवनाथ रामचंद्र गंभीरे (वय ६५) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी निलेश नवनाथ गंभीरे (वय ३३, नेवाळेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी कार चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे वडील नवनाथ गंभीरे हे रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी टाटा कंपनीच्या नॅक्सॉन गाडीमधील अज्ञात चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवून फिर्यादीच्या वडिलांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्यास व छातीस गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला. धडक दिल्यानंतर चालक वाहन न थांबवता निघून गेला. चिखली पोलिस तपास करत आहेत.

