कंपनीतील सॉफ्टवेअर चोरी करून कर्मचाऱ्यांनी स्थापन केली स्वतःची कंपनी!

पिंपरी : बीईपी इंडिया ऑटोमोटिव्ह सिस्टिम्स कंपनीतील दोन सर्व्हिस इंजिनिअर म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंपनीचे सॉफ्टवेअर चोरून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नवीन कंपनी स्थापन केली. ही घटना २१ जानेवारी २०२४ ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत कंपनी बीईपी इंडिया ऑटोमोटिव्ह सिस्टिम्स, दापोडी येथे घडली.

याप्रकरणी बीईपी इंडिया ऑटोमोटिव्ह सिस्टिम्स कंपनीच्या संचालकांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार जयराम निवृत्ती वाणी (भोसरी), हरप्रीत सिंग (हडपसर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीच्या कंपनीमध्ये सर्व्हिस इंजिनिअर म्हणून काम करत असताना कंपनीने दिलेली लॅपटॉपमधील हार्ड डिस्क काढून घेतली. त्यामधील डायनो जीयुआय आणि सीसीआरटी या सॉफ्टवेअरची चोरी केली. स्वतःच्या नातेवाईकांच्या नावाने त्यांनी नेक्सजेन ऑटोमोटीव्ह टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लि. नावाची कंपनी स्थापन केली. त्यांनी खोटी माहिती खरी भासवून फसवणूक केली. कंपनीचे आर्थिक नुकसान केले आणि अमेरिकन तसेच फिर्यादीच्या मालकीच्या कंपनीचा लोगो वापरून कॉन्ट्रॅक्ट्स मिळवले. दापोडी पोलीस तपास करत आहेत.

