एमपीएससी पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली!

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत एमपीएससी घेण्यात येणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार 28 सप्टेंबर रोजी राज्यातील 37 जिल्हा केंद्रावरील 524 उपकेंद्रावर होणार होती .मात्र राज्यातील अनेक भागात निर्माण झालेल्या पूर जन्य परिस्थिती आणि हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे .

आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ही परीक्षा नऊ नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे . राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे .अनेक भागातील नदीवरील आणि ओढ्यावरील पुल नादुरुस्त झाल्याने आणि अनेक गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने गावांचा संपर्क तुटला आहे .त्यामुळे अनेक उमेदवारांना प्रवास करून परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचणे कठीण होणार आहे .
कोणत्याही उमेदवाराला या परिस्थितीत महत्त्वपूर्ण परीक्षेपासून वंचित राहता येऊ नये यासाठीच शासनाच्या सूचनेनुसार आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे .आयोगाच्या या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे .परीक्षेचा कालावधी वाढल्याने आता उमेदवारांना अतिरिक्त परिश्रम घ्यावे लागतील. आयोगाने सर्व उमेदवारांना आवाहन केले आहे की, परीक्षेसंबंधी अद्ययावत माहिती आणि शुद्धिपत्रकासाठी आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे लक्ष ठेवावे.

