कुख्यात निलेश घायवळ पळाला लंडनला!

घायवळ याच्यावर लूक आऊट नोटीस जारी
पुणे :पुण्यातील कोथरूड मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणातील कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे . मात्र कारवाई होण्याच्या अगोदरच घायवळ पुण्यातून परदेशात पळून गेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे . यामुळे पोलिसांच्या तपासात हलगर्जीपणा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोथरुड गोळीबार प्रकरणात गुंड निलेश घायवळ यांच्यासह दहा जणांवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी विरोधी कायद्यानुसार (मकोका) कारवाई केली आहे . कोथरूड गोळीबार प्रकरणी आरोपी मयूर गुलाब कुंबरे, राऊत , चंदिलकर , फाटक , व्यास यांना अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. निलेश घायवळने पासपोर्ट आपल्याकडे जमाच केला नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे.
तसेच घायवळ याच्यावर लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली असून तो भारतात परत येतात त्याला अटक करण्यात येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे . निलेश घायवळ याच्यावर हत्या , खंडणी , अपहरण ,मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असतानाही घायवळ याचा पासपोर्ट पोलिसांनी जप्त का केला नाही असा प्रश्न उपस्थित होतो . घायवळ यांनी गुन्हेगारी कृत्या मधून मोठ्या प्रमाणात पैसा कमावला असून त्यातूनच त्याने लंडनमध्ये घर घेतले आहे. त्याचा मुलगा ही लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

