पैशांसाठी ट्रक चालकाला धमकावणाऱ्या चौघांना अटक!

पिंपरी : लोखंडी सळयांनी भरलेला ट्रक खाली करण्याच्या कामावर एका टोळक्याने १०० रुपये प्रती टन खंडणीची मागणी केली आणि खंडणी दिली नाही तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. ही घटना गुरुवारी (१८ सप्टेंबर) चिंचवड येथे घडली.
या प्रकरणी नईम बशिर शेख (३६, आदर्शनगर, मोशी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आकाश भारत कुदळे (३१, दळवीनगर, चिंचवड), पालेखान इस्माईल इराणी (३७, साईबाबानगर, चिंचवड), निलेश भारत कुदळे (२१, दळवीनगर, चिंचवड) आणि सोन्या कोकरे (दळवीनगर, चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचा ५० टन लोखंडी सळयांनी भरलेला ट्रक खाली करत असताना चार अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले आणि म्हणाले की, “आम्ही या भागातील भाई आहोत आणि तुम्हाला येथे गाडी खाली करायची असेल तर १०० रुपये प्रती टन प्रमाणे पैसे द्यावे लागतील”. एका आरोपीने हातात कोयता घेऊन फिर्यादीला धमकावले आणि शिवीगाळ करत धक्का-बुक्की केली. त्यांनी ५,००० रुपयांची खंडणी मागितली आणि पैसे न दिल्यास जिवंत सोडणार नाही किंवा गाडी फोडण्याची धमकी दिली. आरोपींनी फिर्यादीच्या फोन पे नंबरवरून ४०० रुपये खंडणी स्वीकारली. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.
खंडणीसाठी माथाडी कामगाराला धमकी!
पिंपरी : माथाडी कामगाराने काम करण्यासाठी खंडणीची मागणी केली. ही घटना १३ सप्टेंबर ते १८ सप्टेंबर दरम्यान वाकडमधील वसंत इंन्फीनीया, काळाखडक येथे घडली.
अमित मोहन माने (३९, नेहरु नगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुर्गाप्पा भिमराव देवकर (३७, काळखडक, वाकड) याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीच्या कामगारांना धमकी दिली की, मी मागील तीन वर्षांपासून येथे काम करत आहे. हा माझा भाग आहे, मला पैसे दिल्याशिवाय तुम्हाला येथे काम करता येणार नाही. आरोपीने फिर्यादीच्या नोंदणीकृत माथाडी संघटनेकडून ११० रुपये प्रती टन याप्रमाणे एकूण २,५३० रुपयांची खंडणी मागितली. त्याने ऑनलाइन १,५०० रुपये घेतले आणि नंतर पंचासमक्ष १,००० रुपये घेतले. आरोपीने महाराष्ट्र हमाल सेना असे छापलेली २,५३० रुपयांची पावती स्वतःच्या नावाने दिली. वाकड पोलीस पुढील तपास करत आहेत.


