नामांकित बांधकाम व्यवसायिकांवर इन्कम टॅक्स छापा!

पुणे : शहरातील नामांकित बांधकाम व्यवसायिकाच्या कार्यालयासह त्यांच्या घरी आयकर विभागाने छापा टाकत कारवाई केली आहे . या कारवाईमुळे बांधकाम व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे.

पुण्यातील नामांकित बांधकाम व्यवसायिक कोहिनूर ग्रुपचे प्रमुख कृष्णकुमार गोयल यांच्या सेनापती बापट रस्त्यावरील आयसीसी टॅावर मधील कार्यालयात आणि सिंध सोसायटी औंध मधील घरी छापा टाकण्यात आला .दुसरे व्यावसायिक मित्तल ग्रुपच्या बंडगार्डन भागातील कार्यालयावर छापा टाकण्यात आला. सध्या या कारवाई मागील नेमके कारण अजून स्पष्ट झाले नाही. या कारवाईने अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान तपासांती या कारवाईचे सत्य कळू शकणार आहे.
मुंबईतील आॅनेस्ट एलएलपी प्रकल्पासंदर्भात ईडीने मित्तल ब्रदर्स ग्रुपची यापूर्वी चौकशी केली आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी ऑथॉरिटी अर्थात महारेरा आदेशानंतर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आहे . त्यामध्ये वरळी येथील पॅलेस रॉयल प्रकल्पाचे प्रवर्तक असलेल्या आॅनेस्ट प्रायव्हेट लिमिटेड कडून सुमारे 90 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश देण्यात आले होते .फ्लॅटच्या विलंबित ताबा देण्याबाबतच्या पूर्वीच्या निर्देशाचे पालन करण्यात कंपनी अयशस्वी ठरल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आला होता.

