मित्राच्या वादात मध्यस्थी करताना हॉटेल व्यवसायिकाला मारहाण!

पिंपरी : हॉटेल व्यवसायिकाला मारहाण करून त्याचे दुकान तोडल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (२७ ऑगस्ट) रात्री महाळुंगे एमआयडीसी येथील महिंद्रा कंपनीच्या गेट नंबर २ समोर घडली.
सुशेन दादाराव गटकळ (वय ३६, निघोजे, खेड) यांनी फिर्याद दिली आहे. दत्ता सूर्यवंशी (वय ४५), आदित्य सूर्यवंशी (वय २१), प्रतीक सूर्यवंशी (वय २१), एक महिला आणि अल्पवयीन मुलगा या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या अंडा-भुर्जीच्या टपरीवर मित्रांसोबत जेवण करत असताना आरोपी दत्ता याने त्याच्यासोबत काम करणाऱ्या आचारीला नेपाळी भाषेत “काल नेपाळी सण होता, तरी तू कामावर का आला होतास? मला माझ्या मालकाने काल सुट्टी दिली होती” असे फिर्यादीला ऐकू जाईल अशा पद्धतीने विचारण्यास सांगितले. फिर्यादीने याबाबत विचारले असता आरोपीने शिवीगाळ करत त्यांच्यासोबत झटापट केली. त्यानंतर आरोपीने घरी जाऊन पत्नी आणि मुलांसोबत परत येऊन फिर्यादीला लोखंडी रॉड आणि लोखंडी पट्टीने मारहाण केली. आरोपीच्या पत्नीने हातात लोखंडी रॉड घेतला होता. आरोपीने लोखंडी पट्टी फेकून मारल्याने ती फिर्यादीच्या उजव्या डोळ्याच्या वर कपाळाला लागून त्यांना दुखापत झाली. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला पकडून लोखंडी रॉडने त्यांच्या डोक्यावर आणि हातावर मारहाण केली. आरोपींनी फिर्यादीच्या दुकानातील खुर्च्या आणि टेबल तोडून नुकसान केले. महाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करत आहेत.