सासरच्या मंडळींकडून पुन्हा एकदा हुंडाबळी!

वाकड : आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या हर्षल सूर्यवंशी तरुणाशी दिव्याचा विवाह तीन वर्षांपूर्वी झाला होता. मात्र लग्नानंतर सासरच्या मंडळींकडून सोन्याच्या दागिन्यांसह घरातील फर्निचरासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी होत असल्याचे माहेरच्या नातेवाईकांनी सांगितले. या मागण्यांमुळे दिव्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

सोमवारी संध्याकाळी वाकडमधील उच्चभ्रू डब्ल्यू-57 सोसायटीत ही घटना घडली. मूळची धुळे जिल्ह्यातील असलेली दिव्या शेतकरी कुटुंबातील व उच्चशिक्षित तरुणी होती. तिच्या मृत्यूमागे पती हर्षल सूर्यवंशी व त्याच्या कुटुंबीयांचा सहभाग असल्याचा ठपका माहेरच्या मंडळींनी ठेवला आहे.
या प्रकरणी वाकड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून, दिव्याला छळ करून मृत्यूला प्रवृत्त केल्याप्रकरणी कठोरात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे.