विद्यार्थ्याला रस्त्यात अडवून बेदम मारहाण!

पिंपरी: बॅडमिंटन क्लासवरून घरी जात असताना एका विद्यार्थ्याला अडवून बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी (२९ जुलै) सायंकाळी साडेसात वाजता सोमाटणे फाटा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
तळेगाव दाभाडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष अभिमान सुरवसे (वय २५, पवार वस्ती, दापोडी), राहुल मिलींद सूर्यवंशी (वय २४, दापोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह चिक्या आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी १६ वर्षीय मुलाने पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी बॅडमिंटन क्लासवरून घरी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. ‘आमच्याकडे काय बघतोस’ असे म्हणून फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी ‘मला मारू नका, मला सोडा’ अशी विनंती करत असताना, त्यांच्यासोबत असलेल्या राहुल नावाच्या व्यक्तीने फिर्यादीच्या डोक्यातील हेल्मेटने त्यांच्या डोक्यात, छातीत, नाकावर आणि तोंडावर मारून गंभीर जखमी केले. तसेच आरोपी आशिष सुरवसे याने लाथा-बुक्क्यांनी छातीत आणि पोटात मारहाण करून गंभीर जखमी केले.
ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा मृत्यू!
पिंपरी : पुनावळे येथे ट्रकने स्कुटीला धडक दिल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (३० जुलै) दुपारी काटेवस्ती चौक ते काटेवस्ती कॉर्नरकडे जाणाऱ्या रोडवर पुनावळे येथे घडली.
समीना केशव कुंद्रा (वय ३३) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी केशव गुलाबसिंग कुंद्रा (वय ३६, पुनावळे) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची पत्नी समीना या त्यांची स्कुटी घेऊन घरगुती कामासाठी जात होत्या. आरोपीने त्याच्या ताब्यातील ट्रक हयगयीने आणि निष्काळजीपणाने चालवून समीना यांच्या स्कुटीला धडक दिली. या धडकेत समीना यांच्या डोक्यावरून आणि कमरेवरून ट्रकची चाके गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेची कोणतीही माहिती न देता ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. रावेत पोलिस तपास करत आहेत

