पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल!

पिंपरी : घर बांधण्यासाठी आणि नवीन दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यावरून एका महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केले. याप्रकरणी तिचा पती आणि कुटुंबातील इतर सदस्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. छळाची घटना २०२० पासून २८ जुलै २०२५ या कालावधीत ज्योतिबा नगर काळेवाडी येथे घडली. विवाहितेने २८ जुलै रोजी राहत्या घरात आत्महत्या केली.

निर्मला परमेश्वर वाघमारे (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणात प्रकाश दादाराव वाघमारे (वय ३३, तळवडे, पुणे) यांनी काळेवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पती परमेश्वर श्रावण वाघमारे (वय ४०, जगळपूर, लातूर), सासू गवळणबाई श्रावण वाघमारे (जगळपूर, लातूर), दीर कमलाकर श्रावण वाघमारे (जगळपूर, लातूर), नणंद रमाबाई लेंडेगावकर (जगळपूर, लातूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
काळेवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची मयत बहीण निर्मला वाघमारे (वय ३०) हिचा आरोपी परमेश्वर याच्या सोबत विवाह झाला. त्यानंतर जेमतेम तीन वर्षांनंतर आरोपींनी आपसात संगनमत करून बहिण निर्मला हिला प्रापंचिक कारणावरून घालून पाडून बोलले. घर बांधण्यासाठी आणि नवीन दुचाकी गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याबाबत तिला वेळोवेळी सांगितले. तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. बहीण कामाला जाऊ लागल्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला वेळोवेळी शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपींनी तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने तिने राहते घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

