फ्लॅट खरेदीच्या बहाण्याने बनावट कागदपत्राद्वारे बँकेला ४८ लाखांचा गंडा!

पिंपरी, : फ्लॅट खरेदीच्या बहाण्याने करारनामा करून त्याद्वारे बनावट डिमांड लेटर तयार केले आणि बँकेतून तब्बल ४८ लाखांचे कर्ज घेत फसवणूक केली. ही घटना पिंपरी येथील बँक ऑफ इंडिया शाखेत घडली.
प्रितम प्रफुल्ल वेलणकर (रा. निगडी, प्राधिकरण) आणि सुषमा महादेव माने (रा. माळवालेनगर, किवळे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
अतुलकुमार लाल विरेंद्र विक्रम सिंग (वय ४३, रा. निलगिरी लेन, नालंदा अपार्टमेंट, औंध) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किवळे येथे निलेश पाटील यांच्या मालकीच्या जागेवरील श्रुती प्राईड या इमारतीतील फ्लॅट खरेदीसाठी आरोपींनी आपसात संगनमत करून २३ मे २०१८ रोजी या इमारतीतील फ्लॅटचा खरेदी करारनामा केला. त्याद्वारे बनावट डिमांड लेटर तयार करून त्याआधारे बँक ऑफ इंडिया, पिंपरी शाखेतून ४८ लाखांचे गृहकर्ज घेतले. ही रक्कम सेवा विकास बँकेत सुषमा माने यांच्या श्रुती प्राईड या नावााच्या खात्यात ट्रान्सफर करून बँकेची फसवणूक केली. फौजदार चिरंजिव दलालवाड तपास करीत आहेत.

गॅस सिलींडरचा काळाबाजार पाच जण गजाआड
पिंपरी : घरगुती गॅस सिलींडरमधून व्यावसायिक सिलींडरमध्ये गॅस ट्रान्सफर करून काळ्या बाजारात त्यांची विक्री करणार्या टोळीचा पोलीसांनी पर्दाफाश केला. पोलिसांनी हिंजवडी येथील स्पिनी शोरूमजवळ छापा मारून पाच जणांना अटक केली. या कारवाईत २० लाखाचा अवैध साठा जप्त करण्यात आला. बुधवारी (दि. ९) ही कारवाई करण्यात आली. धर्मपाल जगदीश बिश्नोई (वय २३, रा. पाखरे वस्ती, हिंजवडी), अशोक बाबुराव
सूर्यवंशी (वय ३२, रा. पिंपळे सौदागर), अशोक ओमप्रकाश खिलारी (वय २४, रा. हिंजवडी), बाळु बापू हजारे (वय २५, रा. मारुंजी), ओमप्रकाश सोहनलाल खिल्लेरी (वय ४५, रा. पारखे वस्ती, हिंजवडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
खंडणी विरोधी पथकातील विजय नलगे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हे घरगुती गॅस सिलींडरमधून धोकादायक पद्धतीने गॅस ट्रान्सफर करीत असताना मिळून आले. पोलिसांनी आरोपींकडून गॅस टाक्या, गॅस ट्रान्सफर करण्यासाठी लागणारे साहित्य, वाहने व तीन वजन काटे असा २० लाख २५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. फौजदार ताकतोडे तपास करीत आहेत.

