फक्त मुद्द्याचं!

26th June 2025
कला साहित्य

गीत, संगीत आणि नृत्याविष्कार असलेल्या तालयात्रेच्या बरसातीने रसिक चिंब!

गीत, संगीत आणि नृत्याविष्कार असलेल्या तालयात्रेच्या बरसातीने रसिक चिंब!

पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वर्धापन दिनी रंगला संगीताचा सोहळा
पिंपरी : पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा सुरेख संगम साधत पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर यांनी सादर केलेल्या अप्रतिम तालरचनेतून आणि बंदिशीतून रसिक चिंब झाले. तर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी सादर केलेल्या बंदिशीच्या आविष्काराच्या मंगलदीपाने वातावरण उजळून निघाले.

पिंपरी चिंचवड महापालिकेने भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी वर्धापन दिनाचे औचित्य साधून आकुर्डी येथील ग.दि. माडगूळकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या बहारदार सोहळ्यास रसिकांनी भरभरून दाद दिली. या वर्धापन महोत्सवाचे उद्घाटन उत्साहात झाले.

‘तालयात्रा’ने साकारला सुरांचा मोरपिसारा
पद्मश्री पंडित सुरेशजी तळवलकर यांच्या तालयात्रा कार्यक्रमाने महोत्सवाची सुरुवात झाली. पाश्चात्य आणि भारतीय संगीताचा सुरेख संगम साधत तालयात्रेच्या माध्यमातून पंडित तळवलकर व त्यांच्या साथीदारांनी रंगमंचावर जणू स्वरांची एक जादुई मैफलच उभी केली होती. तालयात्रेमध्ये पंडित सुरेश तळवलकर यांना नागेश आडगावकर (सहगायक), सुरंजन खंडाळकर (सहगायक), अभिषेक शिनकर (हार्मोनियम वादन), पुष्कर भागवत (व्हायोलिन वादन), सावनी तळवलकर (तबला वादन), वेदांग जोशी (तबला वादन), पार्थ भूमकर (पखवाज वादन), अभिषेक भुरूख (ड्रम वादन), ईशान परांजपे (कॅजोन), ऋतुराज हिंगे (कलाबाश) यांनी साथसंगत केली.

nrutya
nrutya

‘मंगलदीप’चा अलौकिक प्रकाश
मंगलदीप कार्यक्रमात पद्मश्री पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा गगनाला भिडणारा तरल स्वर व त्यातून बरसणाऱ्या शास्त्रीय गीतांच्या सरी, आणि रसिकांच्या टाळ्यांचा कडकडाट यामुळे नाट्यगृहातील वातावरण प्रफुल्लित झाले.
पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी सुमधुर आवाजात भावगीत आणि शास्त्रीय गायनाची बहारदार मैफल सादर केली. हे क्षण नाट्यगृहातील प्रत्येक रसिकाच्या मनात कायमचे कोरले गेले. त्यांच्या स्वरांनी वातावरणात एक अलौकिक शांतता पसरली होती, जणू शब्दांना सूर मिळाले आणि भावनांना बोलकं रूप. ‘सर्वस्व तुजला वाहुनी’, ‘केव्हा तरी पहाटे’, ‘मनी लागले जिथे लागले’ या सारख्या भावस्पर्शी गीतांनी श्रोत्यांचे डोळे पाणावले, तर शास्त्रीय गायनाच्या बारीकसारीक आलापांनी रसिक मंत्रमुग्ध झाले. ‘मंगल चरणा गजानन’, ‘श्री स्वामी समर्थ तारक मंत्र’, ‘रूप पाहता लोचनी’, ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा’ इत्यादी गीतांनी श्रोत्यांची मने जिंकली. मंगलदीपमध्ये पद्मजा फेणाणी जोगळेकर यांना महेश खानोलकर (व्हायोलिन वादन), त्रिगुण पटवर्धन (तबला वादन), मंदार पारखी (सिंथेसायझर वादन), नागेश भोसेकर (तालवाद्य), सोनाली बोरकर (हार्मोनियम वादन), तन्वी जोशी (कोरस), राजू दाभोळकर (साउंड इंजिनिअर) यांनी साथसंगत केली.

कार्यक्रम यशस्वितेसाठी संगीत अकादमी पर्यवेक्षक अरुण कडूस, दीपक कन्हेरे, गोरख तिकोने, अनिल जगताप, बन्सी आटवे, बाळाराम शिंदे, सुनील ओहोळ, दीपक जगताप, संगीत शिक्षक समीर सूर्यवंशी, नंदिनी सरीन, वैजयंती भालेराव, स्मिता देशमुख, मिलिंद दलाल, संतोष साळवे, उमेश पुरोहित यांनी परिश्रम घेतले. समन्वयक समीर सूर्यवंशी यांनी संगीत अकादमीच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. तर विकास कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"