संत ज्ञानेश्वर महाराज निघाले पंढरीला पांढुरंग भेटीला!

आजोळ घरात श्रींचा मुक्काम
आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला रात्री उशिरा सुरुवात करण्यात आली . गुरुवारची नित्यनियमाची माऊलींची मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर ग्यानबा-तुकारामाच्या जयघोषात पालखीचे प्रस्थान झाले . टाळ मृदुंगाच्या निनानात मंदिर व शहर प्रदक्षिणा झाली .त्यानंतर माऊलींची पालखी अजोळघरी मुक्कामासाठी गेली. अजूळ घरात फुलांनी सजवलेल्या आसनावर माऊलींच्या पालखीचा पहिला मुक्काम झाला .आळंदीत हरिनामासह ज्ञानोबा तुकाराम यांचा अखंड जयघोष सुरू होता .आज दिवसभर वरूण राजाने जलधारांचा अभिषेक केल्याने वारकरी भाविक सुखावले . वारकरी ग्यानबा तुकाराम यांचा गजर करत भक्तीरसात रममान झाले
माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यानिमित्त मंदिरात आकर्षक अशी फुल सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. वारकरी भाविकांच्या आरोग्यासाठी ठिकठिकाणी आरोग्य केंद्रे उभारली आहेत. तसेच मदती करता पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. मंदिर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त होता. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान ट्रस्ट व व प्रशासनाने भाविकांचे आणि वारकऱ्यांचे स्वागत केले .आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून आलेल्या वारकऱ्यांची मोठी गर्दी झाली .
आषाढी वारी हा संपूर्ण महाराष्ट्राचा उत्सव मानला जातो .या काळात राज्यात भक्ती , उत्सव आणि चैतन्याचे वातावरण असते .सध्या मुसळधार पाऊस पडत असून इंद्रायणी नदी दुधडी भरून वाहत आहे .श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले .लाखो वारकरी अलंकापुरीत प्रस्थानाच्या वेळी ग्यानबा तुकाराम यांच्या गजरात नाचत होते . श्रींच्या पालखीचे वीणा मंडपातून प्रस्थान झाल्यानंतर ,मंदिर प्रदक्षिणा करून पालखी महाद्वारातून प्रदक्षिणामार्गे भरावरस्ता- भैरवनाथ चौक – हजेरी मारुती – चावडी चौक – महाद्वार चौकातून दर्शन मंडप मुक्कामी पोहचेल. आजोळ घरात श्रींची समाज आरती करण्यात आली.
यावेळी जिल्हा न्यायाधीश महेंद्र महाजन,पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार,प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ,पालखी सोहळा प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे,विश्वस्त राजेंद्र उमाप,विश्वस्त चैतन्य महाराज लोंढे,विश्वस्त रोहणीताई पवार,विश्वस्त पुरुषोत्तम महाराज पाटील, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर,माऊलींचे मानकरी योगीराज कुऱ्हाडे पाटील,माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे पाटील,विलास घुंडरे पाटील,नंदकुमार कुऱ्हाडे पाटील, डी डी भोसले पाटील, संकेत वाघमारे,अजित वडगांवकर,नंदकुमार वडगांवकर,दिनेश कुऱ्हाडे व देवस्थान कर्मचारी वारकरी भाविक उपस्थित होते.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त आज पहाटे ४ वाजल्यापासून घंटानाद, काकडा,पवमान अभिषेक, पंचामृत महापूजा, व दुधारती, भक्तांच्या पादुकांवर महापूजा व समाधी दर्शन ,भाविकांना श्रींचे दर्शन, सकाळी ९ ते ११ वीणा मंडपात कीर्तन, श्रींना महानैवद्य भाविकांना श्रींचे दर्शन असा विधीवत कार्यक्रम संपन्न झाला. प्रस्थान सोहळ्याच्या ४७ दिंड्यांना आत घेण्यास सायंकाळी सहा नंतर सुरुवात झाली.,रात्री पालखी प्रस्थान सोहळ्या वेळी श्री गुरु हैबतराव बाबा यांचे तर्फे श्रींची आरती,संस्थान तर्फे श्रींची आरती, मानक-यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आला. वीणा मंडपात ठेवलेल्या पालखी मध्ये श्रींच्या चल पादुकांचे प्राण प्रतिष्ठापणा करुन संस्थान तर्फे मानक-यांना मानाची पागोटी वाटप करण्यात आले..श्रीगुरु हैबतराव बाबा तर्फे दिंडी प्रमुख, प्रतिष्ठित ,मानकरी यांना नारळ प्रसाद वाटप करण्यात आले.