दहावीच्या निकालात कोकण ने मारली बाजी; एकूण निकाल 94.10%

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीच्या शैक्षणिक वर्ष 2024 25 चा निकाल आज जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात यंदा दहावीची परीक्षा दिलेल्यांपैकी 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या प्रमाणात 1.71% घट झाली आहे. विभागवार निकालांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली असून या विभागातून 98.82% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
दहावीच्या परीक्षेत राज्यातील 211 विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळवले आहेत .फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत एकूण 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदा मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 96.14% तर मुलांची टक्केवारी 92.31% आहे. यावर्षी 15 लाख 46 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, त्यापैकी 14 लाख 55 हजार 433 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण 62 विषयांसाठी माध्यमिक शाळा परीक्षा घेण्यात आली होती ,त्यापैकी 24 विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

राज्यात चार लाख 97 हजार 277 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत एकूण 86 हजार 641 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असून या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षा देण्याची संधी आहे, फेर परीक्षेचा अर्ज पंधरा मे 2025 पासून भरण्यास सुरुवात होईल आणि परीक्षा 24 जून पासून सुरू होईल.
विभाग वार टक्केवारी
कोकण 98.82%, कोल्हापूर 96.87%, मुंबई 95.84% ,पुणे 94.81% ,नाशिक 93.04% ,अमरावती 92.95%, छत्रपती संभाजीनगर 92.82%, लातूर 92.77% ,नागपूर 90.78%