चाकण, पिंपरीत १७ किलो गांजा जप्त!

पिंपरी :पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने चाकण येथे दोन तर पिंपरी येथे एक कारवाई करत १७ किलो ३७२ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या तीन कारवायांमध्ये चौघांना अटक करण्यात आली आहे. या
कारवाया शनिवारी (दि. ३) करण्यात आल्या आहेत.
नोहिद अहमदसाब पठाण (वय २४, रा. चाकण), सलमान हसन सय्यद (वय २९, रा.मंचर), सनी विजय शहा (वय २१, रा. नारायणगाव), सनी धर्मासिंग माचरेकर (वय १९, रा. पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पहिली कारवाई चाकण मधील नाणेकरवाडी येथे गुन्हे शाखा युनिट तीनने केली. नोहिद पठाण याच्याकडून पोलिसांनी १७ हजार ३४८ रुपये किमतीचा ३४८ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. पोलीस शिपाई सागर जैनक यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुसरी कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाकी बुद्रुक येथे केली. सलमान सय्यद आणि सनी शहा हे दोघेजण वाकी गावात गांजा विक्रीसाठी दुचाकीवरून आले असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी ७ लाख ६५ हजार ८०० रुपये किमतीचा ११ किलो ८१० ग्रॅम गांजा, दोन मोबाईल फोन, दुचाकी आणि रोकड जप्त केली. विशाल मोहिते नावाच्या व्यक्तीने हा गांजा सलमान आणि सनी यांना विक्रीसाठी आणून दिला असल्याचे तपासात समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई रणधीर माने यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तिसरी कारवाई अमली पदार्थ विरोधी पथकाने पिंपरी मधील रिव्हर रोड येथे केली. सानी माचरेकर यांच्याकडून ५ किलो २१४ ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण ३ लाख ७०० रुपयांचा ऐवज त्याच्याकडून जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश कर्पे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कार कंपनीत लावण्याच्या बहाण्याने साडेतीन लाखांची फसवणूक!
पिंपरी :कार कंपनीत लावण्याच्या आमिषाने एकाकडून ३लाख ६५ हजार ७०० रुपये घेत फसवणूक करण्यात आली. ही घटना म्हाळुंगे-बालेवाडी येथे घडली. शुभम श्रीयम परशुराम सिंग (वय ३०, रा. महाळुंगे-बाणेर, ता. मुळशी) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरज नामदेव लांडगे (वय २७) आणि किरण नामदेव लांडगे (दोघे रा. साकुड, रोचर, आंबेजोगाई, जि. बीड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
ही घटना ऑक्टोबर २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत घडली. आरोपी यांनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून फिर्यादी यांची कार व्हेंडर मार्फत कंपनीत लावण्यासाठी कार चालकाचे व्हेरीफिकेशन, तीन लाख रुपये स्वत:च्या व्यावसायाकरिता तसेच ५० हजार रुपये स्वत:च्या वैयक्तिक अडचणीकरिता आरोपीने घेतले. दरमहा २६ हजाररुपये परतावा देण्याचे आमिष फिर्यादी यांना दाखविले. मात्र, परतावा तसेच मूळ रक्कम परत न देता फिर्यादी यांची फसवणूक केली. पोलिसात तक्रार केल्यास पुण्याबाहेर काढण्याची धमकीही आरोपींनी दिली. फौजदार ठाकरे तपास करीत आहेत.