चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून अष्टविनायक गणपती सह पाच मंदिरात ड्रेस कोड लागू!

चिंचवड : चिंचवड देवस्थान ट्रस्ट कडून अष्टविनायक गणपती सह पाच मंदिरात ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे .मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी ड्रेस कोड चा निर्णय घेण्यात आला असल्याचे चिंचवड देवस्थाने पत्रकात म्हटले आहे.
चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या अख्तरित असलेल्या मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक, चिंचवडचा मोरया गोसावी ,संजीवनी मंदिर, खारनारंगी मंदिर या पाच मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आला आहे. संपूर्ण श्रद्धा आणि भक्ती भावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर येथे आणि श्री मंगलमूर्ती वाडा येथे दर्शनाला येणाऱ्या भाविकांना चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या वतीने विनम्र विनंती करण्यात येत आहे .महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या संजीवन समाधी मंदिर व श्री मंगलमूर्ती वाडा या केवळ वास्तू नसून ते संस्कृती आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पावित्र्यचा आदर राखावा आणि भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. त्यासाठी श्रींच्या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी मंदिरात प्रवेशासाठी योग्य पोशाख परिधान करावा असे निवेदन केले आहे. आपली उपस्थिती आणि वर्तन मंदिराच्या शुद्धतेला अंसरून असावे, यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे .मंदिराच्या पावित्र्याचा सन्मान राखण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे .

प्रवेशासाठी ड्रेस कोड चे नियम
पुरुषांनी पारंपारिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा शर्ट, टी-शर्टआणि पूर्ण पॅन्ट किंवा धोतर, कुर्ता, पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा.
महिलांनी साडी, सलवार, कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपारिक पोशाख परिधान करावा.
मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे कोणीही अति आधुनिक, अपारंपारिक, पारदर्शक, टोकदार, स्लीवलेस, फाटके, शरीर प्रदर्शन करणारे अथवा अनौपचारिक कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये.