छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका : अमित शहा

किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 345 वी पुण्यतिथी
रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशाला स्वराज्य आणि स्वधर्म यांचा मंत्र दिला, त्यामुळे त्यांचे विचार महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. किल्ले रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची 345 वी पुण्यतिथी व शिवरायांच्या समाधीच्या जिर्णोद्वारास शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शहा यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते.
गृहमंत्री शहा यांनी प्रथम राजमाता जिजाऊ यांना नमन केले आणि म्हणाले , जिजाऊंनी शिवरायांना जन्म दिला नाही, तर बाल शिवाजीला त्यांनी स्वराज्य हा विचार दिला .हिंदवी स्वराज्याचे संस्थापक घडवण्याचे काम त्यांनी केले. छत्रपतींचे सुवर्ण सिंहासन ज्या ठिकाणी होते तिथे मी त्यांना अभिवादन केले. त्यावेळी मनात उचंबळून आलेल्या भावना शब्दात मांडता येणार नाहीत. मी अशा व्यक्तीच्या राजदरबारात उभा होतो, ज्या व्यक्तीने स्वराज्य ,स्वधर्म यासाठी आपले पूर्ण आयुष्य वेचले. आदिलशाही, निजामशाही याने वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलण्याचे अवघड काम होते, मात्र छत्रपतींनी ते पूर्ण केले .त्यानंतर मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले आणि स्वराज्याचे स्वप्न साकार केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करुन भगवा फडकविण्यासाठी शपथ घेतली, त्यावेळी महाराष्ट्र अंधकारात बुडालेला होता. स्वराज्याची कल्पनाही कोणी करत नव्हते.

स्वतःला अलमगीर समजणाऱ्या औरंगजेबाला महाराष्ट्राने पराजित करून याच मातीत गाडले. त्याची समाधी देखील याच मातीत आहे. शिवरायांचे शिवचरित्र प्रत्येक भारतीयांना शिकवले गेले पाहिजे .पाचवी ते दहावीपर्यंतच्या भारतातील सर्व विद्यार्थ्यांना हा अभ्यास शिकवला गेला पाहिजे. यासाठी या रायगडाचा इतिहास त्यांना सांगावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रापुरते मर्यादित ठेवू नका, देश आणि जग त्यांच्याकडून प्रेरणा घेत आहे .स्वधर्माचा अभिमान, स्वराज्याची आकांक्षा आणि स्वभाषेला अमर बनवणे ,हे तीन विचार देशाच्या सीमेशी संबंधित नाही. मानवी जीवनाच्या स्वाभिमानाशी जोडले गेले आहेत असे शहा म्हणाले .
छत्रपती उदयनराजे भोसले यांनी थोर पुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी केंद्राने कायदे करावेत. मुंबईतील शिवस्मारक पूर्ण करावे, छत्रपतींचे दिल्लीमध्ये आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावे अशा मागण्या त्यांनी केल्या.या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती उदयनराजे भोसले शिवेंद्रराजे भोसले आणि महाराष्ट्र मंत्रिमंडळातील अनेक सहकारी व शिवप्रेमी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते