डुडुळगाव येथे चाकूने भोसकून ट्रक चालकाचा खून!

पिंपरी : चाकूने भोसकून ट्रक चालक तरुणाचा खून करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.२८) डुडुळगाव येथे घडली. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आमुसाब साहेबलाल मुल्ला (३२, रा. डुडुळगाव, मूळ. रा. कर्नाटक) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
आमुसाब हा ट्रक चालक म्हणून काम करत होता. घरापासून जवळच डुडुळगाव मार्गावरील एका छोट्याशा टेकडीच्या पायथ्याला आमुसाब हा बेशुद्ध अवस्थेत काही नागरिकांना दिसून आला. नागरिकांनी याबाबत तात्काळ पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.
घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी आमुसाब याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी दिघी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून कोणी केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आरोपींच्या शोधासाठी पथके पाठवली असल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी दिली.