दत्तात्रय गाडेला १२ दिवसांची पोलिस कोठडी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पुणे, प्रतिनिधी : पुण्यातील स्वारगेट स्थानकात एसटीच्या शिवशाही बसमध्ये तरूणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १२ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
पुण्यातील स्वारगेट एसटी स्थानकावर उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास बलात्कार झाला. बलात्कारानंतर हा आरोपी जवळपास तीन दिवस पोलिसांना चकवा देत होता. अखेर सीसीटीव्ही फुटेज, श्वान पथक आणि ड्रोनच्या सहाय्याने पोलिसांनी आरोपीला गुणाट या गावातून शुक्रवारी पहाटे अटक केली. यानंतर आरोपीला आज पुणे सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले. दरम्यान या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपीला पुणे न्यायालयाने १२ दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या स्वारगेट बसस्थानकात तरूणीवर अत्याचार झाल्याची घटना उजेडात आल्यानंतर याविरोधात सर्व स्तरांमधून संताप व्यक्त केला जात होता. विरोधकांकडून राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनावर टीका केली जात होती. सीसीटिव्हीतील फुटेजवरून तो इसम सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे असल्याची पोलिसांना खात्री पटली आणि त्यानुसार तपासाची चक्रे फिरू लागली.
“एसटी स्थानकातील २३ सीसीटीव्ही कॅमेरा आणि स्थानकाबाहेरील ४८ सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर दीड ते दोन तासांत आम्ही आरोपीची ओळख पटवली होती. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही आरोपीच्या गावात जाऊन शोधमोहिम घेत होतो. पण आरोपी तेव्हा सापडला नाही. अखेर तो आज सापडला आहे. याकरता मी गावातील नागरिकांचे धन्यवाद देतो. त्या गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. तिथे ज्या-ज्या लोकांनी मदत केली, त्यांचं विशेष अभिनंदन करणार आहोत”, असं पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार भावना आरोपीच्या अटकेनंतर व्यक्त केली.
“पोलिसांकडे शेवटची माहिती आली की तो कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता. तो कोणाला तरी दिसला आणि मग तो तिथून पळाला. ड्रोनच्या सहाय्याने जी दिशा दिसली, त्यातून त्याला अटक करण्यात आली. ज्याने शेवटची माहिती दिली, त्याला एक लाखांचं बक्षिस देण्यात येणार आहे. त्याव्यतिरिक्त गावासाठी काय करता येणार, याचाही आम्ही विचार करणार आहोत”, असेही अमितेश कुमार यावेळी म्हणाले.