दिल्लीकर भगिनींच्या खात्यात महिलादिनी अडीच हजार

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दिल्लीतील महिलांना दरमहा अडीच हजार रुपये आर्थिक मदतीचे केलेले आश्वासन पूर्ण करणार असल्याचे नवी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणाऱ्या नवनिर्वाचित आमदार रेखा गुप्ता यांनी आज (गुरुवारी) सांगितले. या रकमेचा पहिला हफ्ता महिला दिनी येत्या ८ मार्च रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याचेही रेखा गुप्ता यांनी सांगितले.
आम आदमी पार्टीच्या २१०० रुपये मासिक मदतीच्या घोषणेला मागे टाकण्याचे उद्दिष्ट भारतीय जनता पक्षाने निवडणुकीपूर्वीच ठेवले होते. तसा उल्लेख त्यांनी आपल्या जाहिरनाम्यात केला होता. रेखा गुप्ता यांची बुधवारी भाजपाच्या विधिमंडळ गटनेता पदी निवड करण्यात आली. तेव्हा जनतेला दिलेल्या आश्वासनांपैकी महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठीचे मदतीचे आश्वासन आम्ही प्राधान्याने पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्ण करणे हे भाजपाच्या दिल्लीतील सर्व ४८ आमदारांचे ध्येय आहे. आम्ही निश्चितपणे आमची आश्वासने पूर्ण करणार आहेत. यामध्ये महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे वचन अग्रभागी आहे. येत्या ८ मार्च रोजी महिलांना त्यांच्यासाठी निर्धारित केलेली रक्कम १०० टक्के मिळणार आहे, असे गुप्ता म्हणाल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रचंड मतांनी विजय मिळवला आहे. ७० पैकी ४८ जागा जिंकल्या आणि आपच्या दशकभराच्या राजवटीचा अंत केला. दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या (DUSU) माजी अध्यक्षा आणि महानगरपालिकेत नगरसेविका म्हणून काम पाहिलेल्या रेखा गुप्ता, आज दुपारी रामलीला मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत एका भव्य समारंभात दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील.