भंडाऱ्यातील स्फोटात आठ जणांचा मृत्यू

आयुध निर्माण फॅक्टरीत झाला स्फोट; कारखान्याचे छत कोसळून त्याखाली कामगार अडकले
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : भंडारा येथील आयुध निर्माण फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट होऊन काल आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण जखमी झाले आहेत. स्फोटामुळे कंपनीचे छतसुद्धा उडाले आहे.
भंडाऱ्यात जवाहरनगर येथे आयुध निर्माण कंपनी आहे. दुर्घटना घडली तेव्हा १२ कामगार आतमध्ये काम करत होते. यापैकी दोघांना वाचविण्यात यश आले आहे. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, लांबवर या स्फोटाचे हादरे जाणवले आहेत. स्फोटामुळे परिसरातील नागरिक घाबरले होते. अद्याप स्फोटाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. कारखान्याच्या आसपासच्या चार किलोमीटरच्या परिसरात स्फोटाचा आवाज जाणवला होता.
आयुध निर्माण कारखान्याच्या सी सेक्शनच्या इमारत क्रमांक २३ मध्ये हा भीषण स्फोट झाला आहे. स्फोटाचा आवाज ऐकून नागरिक रस्त्यावर येऊन थांबले होते. तर काही तण घाबरून धावले. स्फोटातील जखमींना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. स्फोट झाल्यानंतर कारखान्याचे छत कोसळले आणि त्याखाली कामगार अडकले. तातडीने पोलिस आणि अग्निशामक पथकाने घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य सुरू केले. बचाव कार्यासाठी एसजीआरएफचे पथकही पाचारण करण्यात आले होते.