सैफच्या घरी चाकूहल्ला झाला रिक्रिएट

फॉरेन्सिक टीमला मिळाले आरोपीच्या हातांचे १९ ठसे
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेता सैफ अली खान याच्यावरील चाकू हल्ला प्रकरणाच्या तपासामध्ये मुंबई पोलिसांनी आज (मंगळवारी) पहाटे चाकू हल्ल्याचा प्रसंग रिक्रिएट केला. त्यासाठी आरोपी शरीफुल याला घटनास्थळी आणण्यात आले होते.
सैफ अली खान याच्या बांद्रा येथील सद्गुरू शरण या निवासस्थानी चार गाड्यांमधून २० पोलिसांचे पथक पहाटे साडेतीनच्या सुमारास दाखल झाले. घटनास्थळी तासभर तपास केल्यानंतर पोलिस निघून गेले. या दरम्यानच्या तासभराच्या कालावधीमध्ये सैफच्या घरी त्या चाकू हल्ल्याच्या रात्रीचा प्रसंग पुन्हा एकदा साकारण्यात आला असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. प्रसंगाचे रिक्रिएशन हा पोलिस तपासाचा एक भाग आहे.
चाकू हल्ला रिक्रिएट करण्यासाठी आरोपी शरीफुल याला घटनास्थळी पोलिसांनी आणले होते. तसेच त्याच्या पाठीवर त्या दिवशीप्रमाणे सॅक देखील देण्यात आली. इमारतीच्या पुढील दाराने पोलिसांच्या पथकाने प्रवेश केला. घरातील प्रसंग पुन्हा एकदा घडवून आणल्यानंतर त्याला बांद्रा रेल्वे स्थानकावरही नेण्यात आले होते. तेथूनच शरीफुल याने त्यादिवशी लोकल पकडली आणि तो दादरला गेला होता. तसेच हल्ला केल्यानंतर तो ज्या बागेत जाऊन झोपला होता, तेथेही शरीफुलला पोलिसांनी नेले.
सैफच्या घरी पोलिसांच्या पथकाशिवाय फॉरेन्सिक टिम सुद्धा दाखल झाली होती. बाथरूमची खिडकी, जिने, दरवाजे अशा विविध ठिकाणी आरोपीच्या हातांचे १९ ठसे सापडले आहेत. बाथरूमच्या खिडकीतून प्रवेश करून आरोपी पुन्हा तेथूनच फरार झाला, असे फॉरेन्सिक टीमने म्हटले आहे.
१५ जानेवारी रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास सैफ वर हल्ला झाला होता. मानेवर आणि मणक्यावर वार करण्यात आले होते. त्यानंतर त्याला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि शस्त्रक्रिया झाली. १९ जानेवारी रोजी शरीफुल याला ठाण्यातील कासारवडवली येथून अटक करण्यात आली.