प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात भीषण आग!

तंबू आणि साहित्य जळून खाक; जीवितहानी नाही.
प्रयागराज : उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये तंबू आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. तर आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एका तंबूमध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे. सेक्टर १९ मधील शास्त्री पूल ते रेल्वे पूल दरम्यानच्या परिसरातील एका तंबूत झालेल्या सिलेंडर स्फोटामुळे आग लागली होती. अग्निशमन दलाचे पथक तसेच एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांनी संयुक्त कारवाई करुन आग नियंत्रणात आणली.
या आगीत आतापर्यंत 150 ते 200 तंबू जळून खाक झाले आहेत. तसेच घटनास्थळी आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आहेत. तर येथील सर्व परिसर खाली करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, या आगीत आतापर्यंत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीमध्ये सामान जळत असल्याचे समोर आले आहे. तसेच आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
महाकुंभ मेळ्यात सोमवार १३ जानेवारी २०२५ रोजी पौष पौर्णिमेचे सामान्य स्नान तसेच मंगळवार १४ जानेवारी २०२५ रोजी मकरसंक्रांतीचे शाही स्नान झाले आहे. या व्यतिरिक्त दररोज लाखो भाविक गंगा नदीवर पवित्र स्नान करण्यासाठी येत आहेत. आता बुधवार २९ जानेवारी २०२५ रोजी मौनी अमावस्येनिमित्त आणि सोमवार ३ फेब्रुवारी २०२५ रोजी बसंत पंचमी अर्थात वसंत पंचमीनिमित्त महाकुंभमेळ्यात शाही स्नान होणार आहे.