मराठी सिनेमांच्या स्क्रीनसाठी उपाय आपणच शोधायचा

अभिनेता सुबोध भावे याची प्रतिक्रिया; `संगीत मानापमान` सिनेमा प्रदर्शित
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : सिनेमागृहात मराठी सिनेमाला पुरेसे स्क्रीन मिळत नाहीत, ही तक्रार करीत बसण्यापेक्षा आपणच यावर उपाय शोधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असं अभिनेता सुबोध भावे याने म्हटले आहे.
संगीत मानापमान हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. त्यावेळी तो बोलत होता. सुबोध भावे म्हणाला की, मराठी चित्रपटांना हिंदी आणि हॉलीवूडच्या टायटल्सपेक्षा महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये पुरेशी स्क्रीन्स संख्या मिळवून देण्याच्या आव्हानांना आपल्याला अजूनही तोंड द्यावे लागत आहे. चित्रपट उद्योगाने या समस्येचे निराकरण करण्याचे मार्ग शोधले पाहिजेत.
मराठी सिनेमे दाखविण्यासाठी आम्हाला स्क्रीन मिळत नाहीत, ही तक्रार आता आपणच थांबविली पाहिजे. किती वर्षं आपण मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नाही म्हणून झगडणार आहोत? त्या तक्रारीवर आपणच उपाय शोधायला हवा. जसे, अलिकडेच हॅशटॅग तदेव लग्नम या सिनेमाचे काही शो आम्ही चक्क नाट्यगृहात प्रदर्शित केले आणि रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
एखादा सिनेमा नाट्यगृहात प्रदर्शित करण्याचा पहिलाच प्रयोग पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात झाला. अभिनेता सुबोध भावे याची भूमिका असलेला हॅशटॅग तदेव लग्नम हा सिनेमा तिथे प्रदर्शित करण्यात आला होता. सुबोध याने तेव्हा म्हटले होते की, मराठी सिनेमाला स्क्रीन मिळत नाही, तर उपाय आपण शोधू. तसेही नाट्य प्रयोग नसतील तर नाट्यगृह रिकामे पडलेले असते. मग त्याची देखभाल होत नाही. त्यापेक्षा तिथे स्क्रीनवर मराठी सिनेमा प्रदर्शित केला तर नाट्यगृह सुद्धा चालू राहील, लोकांना मराठी सिनेमा स्क्रीन वर पाहता येईल आणि चित्रपट अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकेल.
(संदर्भ – पीटीआय)