ही तर संपूर्ण देशाची फसवणूक!

पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळला
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पूजा खेडकर हिने केवळ एका संस्थेची नव्हे, तर संपूर्ण देशाची फसवणूक केली आहे, अशा कडक शब्दात ताशेरे ओढत दिल्ली उच्च न्यायालयाने तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.
खोट्या कागदपत्रांच्या आधारे स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातू सरकारी नोकरी मिळविण्यासाठी ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा लाभ घेणाऱ्या पूजा खेडकर हिला दिल्ली उच्च न्यायालयानं जोरदार दणका दिला आहे. माजी प्रशिक्षणार्थी आयएएस असलेल्या खेडकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलेला आहे. त्यामुळे तिला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. पूजा खेडकरनं केवळ संस्थेची नव्हे तर देशाची फसवणूक केली आहे, अशा शब्दात न्यायालयानं ताशेरे ओढले आहेत.
पूजा खेडकरला आधी अटकेपासून अंतरिम संरक्षण देण्यात आलेलं होतं. पण ते संरक्षण काढून घेण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं घेतला. ३१ जुलैला यूपीएससीनं खेडकरची उमेदवारी रद्द केली होती. आयोगाकडून भविष्यात घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षा देण्यात येणार नाही, असा आदेशच काढण्यात आला होता. त्यानंतर आता दिल्ली उच्च न्यायालयानं खेडकरला दणका दिला आहे. हे प्रकरण म्हणजे केवळ यूपीएससीची फसवणूक नाही, तर सर्व समाजाची फसवणूक असल्याचं न्यायालयानं खेडकरचा जामीन फेटाळताना म्हटलं.
‘याचिकाकर्त्याचं वर्तन समाजातील वंचित समूहांसाठीच्या योजनांचा लाभ घेण्याच्या हेतूनं प्रेरित आहे. पण त्या वंचित समूहातील नसल्याचं तपासातून समोर आलेलं आहे. त्यांच्याकडे लक्झरी कार आहेत. पूजा यांचे आई, वडील प्रभावशाली आहेत. पूजा यांनी मिळवलेली कागदपत्रं त्यांच्या आई, वडिलांच्या माध्यमातून मिळवलेली असू शकतात. पूजा खेडकर यांनी केलेले प्रयत्न यंत्रणेत मोठी हेराफेरी करण्याच्या मोठ्या कटाचा भाग असू शकतात. प्राथमिकदृष्ट्या तसं वाटत आहे. लाखो विद्यार्थी यूपीएससी परीक्षा देतात. पूजा खेडकर यांनी वापरलेली पद्धत अनेक प्रश्न निर्माण करते. फसवणुकीचे हे मोठं उदाहरण आहे. त्यांनी केवळ एका संस्थेची फसवणूक केलेली नाही, तर संपूर्ण देशाचीच फसवणूक केली आहे,’ असं उच्च न्यायालयानं खेडकरचा अटकपूर्व जामीन फेटाळताना म्हटलं.