शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : जोवर पूर्ण निकाल लागत नाही, तोवर मतमोजणी केंद्र सोडायचे नाही, असा आदेशच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शप) पक्षातील कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना आज दिला आहे.
विधानसभेसाठी २० नोव्हेंबरला मतदान झाल्यानंतर लगोलग संध्याकाळी अनेक एक्झिट पोलचे आकडे बाहेर आले आणि संमिश्र अंदाज व्यक्त झाले आहे. या अंदाजानुसार आता राज्यातल्या सत्तेची समीकरणं कशी आखली जातील यावरही जोरदार चर्चा सुरू आहे. सर्वच राजकीय पक्षातील वरिष्ठांच्या पातळीवर या समीकरणाची मांडणी सुरू झाली आहे. त्यानुसार मित्रपक्ष, अपक्ष अशा सर्वांना हाताशी धरून बांधून ठेवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
अशातच, शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांची आज ऑनलाइन बैठक घेतली आहे. राज्यभरातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते. कोणत्याही एक्झिट पोलचा ताण घेऊ नका, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. बैठकीमध्ये एक्झिट पोल वरील अंदाजावर चर्चा करण्यात आली.
महाविकास आघाडी गाठणार १५७?
महाविकास आघाडीला १५७ जागा मिळतील, असा अंदाज शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. राज्यात सत्ता स्थापनेला १४५ जागांची आवश्यकता असते. त्यापेक्षा १२ अधिक जागा महाविकास आघाडीला मिळतील, असा अंदाज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला आहे.