विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सरासरी ६५ टक्के मतदान

दिग्गज उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद
मुंबई : पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी आज सरासरी ६५ टक्के मतदानाची नोंद झाली असून मतदानाची वेळ संध्याकाळी सहा वाजता संपत असली तरी निवडणूक नियमानुसार संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान केंद्रावर आलेल्या मतदाराला मतदान करता येते. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर अनेक मतदान केंद्रात मतदानाची प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे राज्यात मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्यात ५८. २२ टक्के मतदान झाले. राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्याने सर्वपक्षीय दिग्गज उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात बंद झाले. त्यामुळे राज्यातील मतदारांनी नेमका कुणाला कौल दिला याची उत्सुकता ताणली गेली असून आता सर्वांना नजरा २३ नोव्हेंबरच्या मतमोजणीची आणि निकालाकडे लागले आहे.
अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर सकाळपासून मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. तर दुपारी काही मतदारसंघात शुकशुकाट होता. मात्र, संध्याकाळी चार वाजल्यानंतर मतदार मतदानासाठी पुन्हा घराबाहेर पडल्याचे चित्र दिसले. ग्रामीण भागात काही मतदान केंद्रावर मतदारांनी विकासकामांच्या मुद्द्यावरून मतदानावर बहिष्कार टाकल्याचे वृत्त आहे.
महत्वाच्या उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद
शिवसेना शिंदे गट : एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे, दीपक केसरकर, तानाजी सावंत, उदय सामंत, अब्दुल सत्तार, संजय राठोड,शंभूराज देसाई
भाजप: देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, डॉ. विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे, रवींद्र चव्हाण, मंगलप्रभात लोढा
राष्ट्रवादी अजित पवार गट : अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील, नवाब मलिक
काँग्रेस : पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार
शिवसेना उद्धव ठाकरे गट ; आदित्य ठाकरे, अजय चौधरी, वैभव नाईक, सुनील प्रभू
राष्ट्रवादी शरद पवार गट : जयंत पाटील, राजेश टोपे, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, युगेंद्र पवार, रोहित पाटील