तेलंगणात बोगद्यात आठ जण अडकले

५२ कामगारांनी करून घेतली स्वतःची सुटका; बचाव कार्य सुरूच
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
तेलंगणा (वृत्तसंस्था) : तेलंगणातील नगरकुर्नूल जिल्ह्यातील श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल (SLBC) बोगद्याचा एक भाग २२ फेब्रुवारी रोजी कोसळला होता. त्यावेळी काम करत असलेल्या ६० पैकी ५२ कामगारांनी आपला जीव वाचवला पण अजूनही आठ कामगार आतमध्ये अडकले असून एनडीआरडी-एसडीआरएफ बचावकार्य करत आहे.
एसडीआरएफ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बोगद्याच्या आत जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. तिथे गुडघ्यापर्यंत चिखल आहे. बोगद्याच्या आत अडकलेल्या कामगारांसाठी पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. पाणी काढण्यासाठी १०० अश्वशक्तीचा पंप लावण्याचे आदेश दिले आहेत. १४५ NDRF आणि १२० SDRF जवान बचावकार्यासाठी तैनात आहेत. सिकंदराबादमधील इन्फंट्री डिव्हिजनचा भाग असलेल्या लष्कराच्या इंजिनीअर रेजिमेंटलाही सज्ज ठेवण्यात आले आहे.
शनिवारी (२२ फेब्रुवारी) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. बोगद्यामध्ये आत जाण्याच्या प्रवेश बिंदूपासून १४ किमी अंतरावर सुमारे तीन मीटर बोगद्याचे छत कोसळले आहे. दुर्घटना घडली त्यावेळी सुमारे ६० लोक बोगद्यात काम करत होते. ५२ लोक कसेबसे जीव मुठीत घेऊन बचावले, पण टनेल बोरिंग मशीन (TBM) चालवणारे आठ लोक बोगद्यामध्येच अडकून पडले आहेत. यामध्ये दोन अभियंते, दोन मशीन ऑपरेटर आणि चार मजुरांचा समावेश आहे. त्यांना बाहेर आणण्यासाठी अजूनही बचाव कार्य केले जात आहे.
पंजाबमधील तरनतारन येथे राहणारा गुरप्रीत सिंग हा देखील बोगद्यात अडकला आहे. त्यांच्या घरी आई, पत्नी आणि दोन मुली आहेत. मोठी मुलगी १६ वर्षांची आणि धाकटी १३ वर्षांची आहे. वडिलांचे निधन झाले आहे. कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच असून तो २० दिवसांपूर्वीच घरून कामावर परतला होता. तेलंगणा बोगद्यात अडकलेला श्री निवास (४८) चांदौली जिल्ह्यातील सदर कोतवाली भागातील माटीगाव येथील रहिवासी आहे. श्री निवास हा २००८ पासून हैदराबाद येथील जेपी कंपनीत कनिष्ठ अभियंता (JE) म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय उन्नाव येथे राहणारे मनोज कुमार हे देखील याच कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत आहेत.