बांधकाम भागीदारी व्यवसायात 36 लाखांचा अपहार!

पिंपरी : बांधकाम व्यवसायात भागीदारी करून गुंतवणूकदाराच्या पैशांचा वैयक्तिक कामासाठी वापर करून फसवणूक केल्याचा प्रकार भोसरी येथे उघडकीस आला आहे. ही घटना 12 फेब्रुवारी 2024 ते 7 ऑक्टोबर 2025 या दरम्यान इंद्रायणी नगर भोसरी येथे घडली.

याप्रकरणी 33 वर्षीय व्यक्तीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. साकेत प्रदीप शहा (वय 42, रा. कोंढवा, पुणे )या बांधकाम व्यवसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शहा यांनी फिर्यादीला बांधकाम व्यवसाय करण्यास प्रवृत्त केले होते. फिर्यादीने संस्थेमध्ये एकूण 80 लाख 47 हजार 349 रुपयांची गुंतवणूक केली. आरोपीने त्यापैकी 36 लाख 15 हजार 880 रुपये व्यवसायासाठी न वापरता स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी खर्च केले. फसवणूक लपविण्यासाठी आरोपीने बनावट हिशेब तयार करून फिर्यादीला ई-मेलवर पाठवला होता. स्वतःची सॅलरी व कमिशन यामध्ये दाखवले होते. तसेच स्वतःच्या वैयक्तिक कामासाठी पैसे खर्च करून फिर्यादी यांच्या पैशाचा अपहार करत त्यांची फसवणूक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस याबाबत तपास करत आहेत.

