जादा परताव्याच्या आमिषाने ३१ लाखांची फसवणूक

पिंपळे गुरव येथील घटना
सांगवी : गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास भाग पाडले. यातून एका व्यक्तीची ३१ लाख ५८ हजार ८५७ रुपयांची फसवणूक केली. व्हाटसपवरून ऑनलाइन पद्धतीने सप्टेंबर २०२४ ते २० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत फसवणुकीचा हा प्रकार घडला.
पिंपळे गुरव येथील ५२ वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी शुक्रवारी (दि. १४) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. गितीका आनंद, व्हाटसप नंबरधारक, लिंकधारक, तसेच बँकेचे खातेधारक असलेल्या संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गितीका आनंद या संशयित व्यक्तीने फिर्यादी यांना व्हाटसप ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. त्यानंतर ग्रुपमधील लिंकवर क्लिक करण्यास सांगून फिर्यादीच्या मोबाइलमध्ये झेडडी ट्रेड प्रो प डाउनलोड करण्यास भाग पाडले.
या सॉफ्टेअरच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास जास्तीचा परतावा मिळत असल्याचे ग्रुपवर भासवले. त्यातून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीस बँकेचे खात्यावर ३१ लाख ५८ हजार ८५७ रुपये गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, गुंतवणुकीवर परतावा व गुंतवणूक केलेली रक्कम परत न देता संशयितांनी फिर्यादीची फसवणूक केली. सांगवी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.