दहीहंडी उत्सवात मुंबईत २४५ गोविंदा जखमी

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
मुंबई, प्रतिनिधी : मुंबई आणि उपनगरात विविध ठिकाणी दहीहंडी उत्सवामध्ये जवळपास २४५ गोविंदा जखमी झाले आहेत.
मुंबई, ठाणे, विक्रोळी, दादर आणि उपनगरात विविध ठिकाणी दंहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होत असतो. मानवी मनोरे रचत गोविंदा हंडी फोडतात आणि दरवर्षी विक्रम करत असतात. यंदा गोविंदा पथकांचा दहा थर रचण्याचा विक्रम मात्र पूर्ण होऊ शकला नाही. नऊ थर रचून विक्रमी सलामी देत दहीहंडी फोडण्यात आली.
दहीहंडी उत्सवात गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न नेहमीच उपस्थित केला जातो. दहीहंडी उत्सवाचे आयोजक गोविंदा पथकांसाठी मोठमोठ्या रकमेची बक्षीसे घोषित करत असतात. उत्सवाला प्रसिद्धी मिळण्यासाठी आणि गर्दी होण्यासाठी वेगवेगळे सेलिब्रिटी बोलावले जातात. अशातच अपुऱ्या सुरक्षा विषयक सुविधांमुळे गोविंदांना आपला जीवही गमवावा लागतो. यंदा दहीहंडीच्या दिवशी दिवसभरात २४५ गोविंदा जखमी झाल्याची नोंद करण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.