छत्तीसगडमध्ये एका चकमकीत १६ नक्षलवादी ठार!

भोपालपट्टनममध्ये तीन महिन्यांत ७८ नक्षलवादी ठार
छत्तीसगड : छत्तीसगडमध्ये सुकमा आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक सुरू आहे. या चकमकीत आतापर्यंत १६ नक्षलवादी ठार झाले आहेत. मोहीम अद्याप सुरू आहे. चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत.
सुरक्षा पथकाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवार २९ मार्च २०२५ रोजी सकाळी चकमक सुरू झाली. ही चकमक केरलापाल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जंगलात सुरू आहे. डीआरजी अर्थात डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (जिल्हा राखीव जवान) आणि सीआरपीएफ अर्थात सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (केंद्रीय राखीव पोलीस दल) यांनी संयुक्त कारवाई केली. याआधी मंगळवारी सुरक्षा पथकांनी दंतेवाडा जिल्ह्यात तीन नक्षलवाद्यांना ठार केले. ठार केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये २५ लाखांचे बक्षिस लावलेल्या सुधीर उर्फ सुधाकर उर्फ मुरली नावाच्या नक्षलवाद्याचाही समावेश आहे. घटनास्थळावरुन इंसास रायफल, ३०३ रायफल आणि इतर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
छत्तीसगडमधील भोपालपट्टनममध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत सुरक्षा पथकांनी ७८ नक्षलवादी ठार केले. काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपवणार असे जाहीर केले. ही घोषणा झाल्यापासून सुरक्षा पथकांच्या नक्षलवाद्यांच्या विरोधातील मोहिमा वाढल्या आहेत.